आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान समितीकडून चोख व्यवस्थापन करण्यात येतं. मात्र तरीही अशा प्रकारची घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चेंगराचेंगरीच्या या घटनेनंतर आता काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहेत.
बुधवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय. तर तीसपेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती समजते. मंदिरात चोख नियोजन असतानाही अशी घटना कशी घडली? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत आता माहिती समोर येतेय. तिरुपती मंदिरात दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते.
देवस्थान समितीकडून वैकुंठ महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाचं टोकन वाटप केलं जात होतं. ते टोकन देण्यासाठी अनेक काउंटर्सही होते. यातलंच एक काउंटर विष्णू निवास मंदिराजवळ असलेल्या बैरागीपट्टा भागात एमजीएम हायस्कूलमध्ये होतं.
पास घेण्यासाठी बुधवारी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर ही गर्दी होती आणि रात्रीही मोठ्या संख्येनं भाविक रांगेत होते. रांगेतल्या भाविकांमध्ये पास घेताना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यावेळी चेंगराचेंगरी होऊन गोंधळ उडाला.
तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख बीआर नायडू यांनी सांगितलं की, बैरागीपट्टेडामधील काउंटरवर टोकन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तेव्हा गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी एक गेट बंद ठेवण्यात आलं होतं. रांगेत उभा असलेल्या महिलेला तेव्हा अस्वस्थ वाटायला लागलं. तिला बाहेर जाण्यासाठी गेट उघडलं पण तेव्हाच बाहेरच्या भाविकांनी आत येण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चेंगराचेंगरीची घटना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्री नायडू यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केलीय. मुख्यमंत्री कार्यालय या घटनेचे अपडेट घेत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.