बुलढाणा जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सध्या भीतीच वातावरण आहे. या गावातील काही रुग्णांना अचानक टक्कल पडू लागलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड आणि कठोरा या गावांमध्ये केस गळतीच्या आजाराची दहशत पसरली आहे.
स्थानिक आरोग्य विभागाने या बाबतीत सर्वेक्षण करून, अचानक सुरु झालेल्या या केसगळतीची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
रुग्णांना एकदा केसगळती सुरु झाली की काही दिवसांमध्ये संपूर्ण टक्कल पडत असल्याची तक्रार या गावातील नागरिकांनी केली आहे.
या गावांमध्ये राहणारे सुमारे 50-55 नागरिकांना या आजाराची लागण झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या आजाराची लागण झाल्यानंतर आधी डोकं खाजवतं आणि नंतर सरळ केस हातात येऊ लागतात आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी टक्कल पडत असल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे.
हे नेमकं का होतंय या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नसलं. तरी स्थानिक डॉक्टरांनी या रुग्णांवर प्राथमिक उपचार सुरु केले आहेत.
BBC BBC केसगळतीचा त्रास झालेले रुग्ण काय म्हणाले?शेगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये हा त्रास प्रामुख्याने आढळून आल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अनेक नागरिकांनी केसगळतीची तक्रार केल्यानंतर भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वचारोगतज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी केली.
या रुग्णालयात डोक्याच्या त्वचेचे नमुने देण्यासाठी आलेल्या रुग्णांनी त्यांचे अनुभव सांगितले.
काहीजणांनी काही विशिष्ट कंपन्यांचे शाम्पू वापरल्यानंतर हा त्रास सुरु झाल्याचं सांगितलं आहे. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अहवाल येईपर्यंत नेमकं कारण सांगता येणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
वानखडे ग्रामीण आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी आदरट यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "मी या गावांमधील सात ते आठ रुग्णांची तपासणी केली आहे. बाकीचे रुग्ण तपासणीसाठी स्वतःहून तयार झाले नाहीत. मी ज्या रुग्णांची तपासणी केली त्यांच्या टाळूवर काही पॅचेस होते. आणि रुग्णांच्या डोक्याला खाज सुटली होती. नव्वद टक्के रुग्णांनी डोकं खाजवत असल्याची तक्रार केली होती. अशी बहुतांश रुग्णांना हिवाळ्यामध्ये होणाऱ्या टीनिया कॉर्पोरीस, टीनिया कॅपेटीस, पिटिरीयासीसी कॅपेटीस अशा आजारांची लागण झाल्याचं दिसून आलं. यासोबतच आम्ही या गावांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळे पाठवले आहेत."
डॉ. आदरट म्हणाले की, "आम्ही रुग्णांच्या त्वचेची तपासणी करणार आहोत. त्यामध्ये रुग्णांच्या डोक्याच्या त्वचेचा 3मिलीमीटरचा तुकडा काढून तपासणीसाठी पाठवला जातो. त्या तपासणीचा निकाल आल्यानंतर आम्ही उपचार करणार आहोत. माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडलं आहे त्यामुळे तपासणीचे अहवाल आल्याशिवाय नेमकं कारण सांगता येणार नाही. बऱ्याचदा कुटुंबात एकच टॉवेल, कंगवा वगैरे वापरल्यामुळे हा आजार पसरतो."
BBC/NiteshRaut डॉ. बालाजी आदरटज्या रुग्णांना हा त्रास झाला त्यापैकी काही जणांनी त्यांच्या त्वचेचे नमुने दिले आहेत.
केसगळीतचा त्रास झालेले भोनगावचे रहिवासी दिगंबर इलामे म्हणाले की, "माझे केस चालले म्हणून दवाखान्यात दाखवण्यासाठी आलो. मी एक दिवस पांढऱ्या रंगाच्या पॉकेटमधला शाम्पू लावला होता त्यामुळे केस चालले होते. मला दुसऱ्या कोणत्या कारणामुळे केस चालले आहेत असं वाटत नाही. याआधी कधीच आमच्या गावात अशा पद्धतीने केसगळती झाली नाही. आमच्या गावात सुमारे 25 लोकांना हा त्रास होतो आहे. पहिल्यांदा एक दिवस डोकं खाजवतं आणि मग केस गळू लागतात. मला मोठं टक्कल पडलं होतं पण आता पुन्हा केस येऊ लागले आहेत. आमच्या गावात खारट पाणी येतं, त्यामुळेही असं होऊ शकतं. डॉक्टरांनी अजून याचं कारण शोधून काढलेलं नाही. पाण्याचे नमुने घेऊन दहा दिवस झाले पण अजून रिपोर्ट आला नाही."
BBC/NiteshRautकेसगळीतला घाबरून काहीजणांनी थेट टक्कल करण्याचा निर्णय घेतला. टक्कल केल्यानंतर डोक्याची खाज कमी झाली आणि पुन्हा केस नियमित वाढू लागले असंही एका रुग्णाने सांगितलं.
केसगळतीचा त्रास सुरु झाल्यानंतर टक्कल केलेले मारुती इलामे म्हणाले की, "आठ ते दहा दिवसांपूर्वी मला केसगळतीचा त्रास सुरु झाला. डोकं खाजवू लागलं आणि मग मी टक्कल केलं. केस एवढे गळत होते की, केसाचं पुंजकच हातात येत होतं. आता डोक्याची खाज बंद झाली आहे आणि पुन्हा केस वाढत आहेत. टक्कल केल्यापासून डोक्याला कसलाही त्रास नाही. मी कसलाच शाम्पू वापरत नाही, आता हे पाण्यामुळे झालं की काय काय माहिती? आता डॉक्टरच काय ते सांगतील. गावातील वीसेक लोकांना हा त्रास होतोय. "
गावात गोडं पाणीच नाहीभोनगाव हे गाव खारपाणपट्ट्यात येतं. त्यामुळे या गावात गोड्या पाण्याचे साठे कमी आहेत. याबाबत बोलताना सरपंच रामा पाटील थारकर म्हणाले की, "गेल्या दहा दिवसांपासून माझ्या गावात एक अजब आजार पसरलेला आहे. आधी एका कुटुंबातल्या व्यक्तीला या आजाराची लागण झाली, त्यानंतर त्याचं कुटुंब आणि आता गावभर हा आजार पसरला आहे. लोकांची केसगळती होत आहे. या आजारामुळे गावात भीतीच वातावरण आहे. गावातील जवळपास वीस रुग्णांना टक्कल पडलं आहे. एकदा केसगळती सुरु झाली की पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्ण टक्कल पडत आहे. याबाबत आम्ही आरोग्य विभागाला पत्र दिलेलं आहे."
थारकर म्हणाले की, "हे गाव खारपाणपट्ट्यातलं आहे त्यामुळे गावात गोडं पाणी येत नाही. रोजच्या वापरासाठी आम्ही ट्यूबवेल खणल्या आहेत आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागतात. खाऱ्या पाण्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झाले आहेत.
आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत, नेमकं काय झालंय ते तपासणीनंतरच कळेल
BBC/NiteshRaut सरपंच रामा पाटील थारकरशेगाव तालुक्यातील सहा गावांनी या आजाराची तक्रार केल्यानंतर. बुलढाण्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी अमोल गीते यांनी यापैकी काही गावांना भेटी दिल्या. प्राथमिक पातळीवर फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे हा त्रास झालेला असू शकतो असं ते म्हणाले.
BBC/NiteshRaut अकोल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी अमोल गीतेबीबीसी मराठीला डॉ. अमोल गीते यांनी सांगितलं की, "अचानक हा त्रास सुरु झाला आहे. रुग्णाचं योग्य निदान आणि त्यांच्यावर उपचार व्हावेत म्हणून आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना बोलावलं आहे. त्यांनी आता तपासणीसाठी नमुने पाठवले असून नेमकं काय झालंय ते अहवाल आल्यानंतरच कळेल. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. डॉक्टरांना हे फंगल इन्फेक्शन वाटत आहे त्यामुळे आम्ही अहवाल येण्याआधीच त्या अनुषंगाने उपचार सुरु केले आहेत. असं असलं तरी नेमकं कारण कळेपर्यंत काहीही बोलणं योग्य ठरणार नाही."
या सगळ्या गावांमध्ये सध्या भीतीच वातावरण आहे. मात्र काही रुग्णांनी हा त्रास कमी झाल्याचंही सांगितलं आहे. गावातल्या नागरिकांमध्ये कोरोनासारखा एखादा विषाणूमुळे हा आजार पसरल्याच्या किंवा विशिष्ट कंपनीचा शाम्पू वापरल्यामुळे टक्कल पडत असल्याचा चर्चा सुरु आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)