सोलापूर : विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक बदलले पण विद्यार्थ्यांना जुनेच हॉल तिकीट मिळालेले होते. त्यामुळे सोमवारी मराठीचा पेपर असूनही तीन महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी परीक्षेला आलेच नाहीत. हॉल तिकिटाच्या संभ्रमामुळे हा प्रकार घडला. या विद्यार्थ्यांची नंतर परीक्षा घेतली जाणार आहे.
विद्यापीठाची नियोजित सत्र परीक्षा १० दिवस लांबली, पण पूर्वीच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन वितरित करण्यात आली होती. त्यानंतर नवीन वेळापत्रक जाहीर झाले व त्यानुसार पुन्हा नव्याने हॉल तिकिटे महाविद्यालयांना ऑनलाइन पाठविण्यात आली. पण, जुने हॉल तिकीट घेतलेले विद्यार्थी मराठीचा पेपर असतानाही त्या दिवशी पेपर नसल्याचे समजून आले नसल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाची नियोजित परीक्षा लोकसभा निवडणूक व इलेक्शन ड्युटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म देखील विद्यापीठापर्यंत वेळेत पोचले नव्हते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
पण, जुन्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट संबंधित महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोचली होती. विद्यार्थ्यांना बदललेले वेळापत्रक व नव्या हॉल तिकिटाबद्दल काहीही माहिती झाली नाही. कारण, जुन्या हॉल तिकिटानुसार त्या दिवशी त्यांचा कोणताही पेपर नव्हता. ही बाब विद्यापीठाला समजल्यानंतर त्यांनी संबंधित महाविद्यालयांना पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून हा प्रकार चुकीने घडल्याचे लेखी घेण्यात आले आहे. आता विद्यापीठ त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा जानेवारीअखेर घेणार आहे.
‘नेट’मुळे सात दिवसांचे पेपर पुन्हा
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ‘नेट’च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ३, ६, ७, ८, ९, १५ आणि १६ जानेवारीला नेटचे पेपर आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे त्या दिवशीचे पेपर पुढे घेतले जाणार आहेत. अनुक्रमे त्या दिवशीचे पेपर १९ ते २५ जानेवारी या काळात घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. एमपीएससी, युपीएससी परीक्षांमुळे देखील विद्यापीठाने आपली परीक्षा त्या दिवशी घेतली नव्हती.
त्या विद्यार्थ्यांची घेतली जाईल पुन्हा परीक्षा
विद्यापीठाशी संलग्नित एकूण महाविद्यालयांपैकी तीन महाविद्यालयांमधील विद्यार्थी मराठी विषयाच्या पेपरला आलेच नाहीत. त्या विद्यार्थ्यांकडे जुन्या वेळापत्रकानुसार दिलेले हॉल तिकीट असल्याने त्या दिवशी पेपर नसल्याचे समजून हा प्रकार झाला, असे संबंधित महाविद्यालयांनी लेखी उत्तर दिले आहे. तेवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे नियोजित आहे.
- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ