swt84.jpg
37161
मुळदे ः उद्यानविद्या महाविद्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय पुष्परचना स्पर्धा आणि अनोख्या अशा पुष्परचना व इनडोअर गार्डन प्रदर्शनाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी भेट दिली. (छायाचित्र ः अजय सावंत)
‘मुळदे’च्या तपपूर्तीचा सार्थ अभिमान
डॉ. प्रदीप हळदवणेकरः ‘उद्यानविद्या’मध्ये पुष्परचना स्पर्धेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ः मुळदेसारख्या ग्रामीण भागात वसलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव शासकीय महाविद्यालय आज एक तप पूर्ण करून १४ व्या वर्षात पदार्पण करत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी केले.
उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक वर्ग, अधिकारी कर्मचारी मजूर वर्गांच्या सहकार्याने व मेहनतीने जिल्हास्तरीय पुष्परचना स्पर्धा आणि अनोख्या पुष्परचना व इनडोअर गार्डन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला. सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
उद्यानविद्या महाविद्यालयाच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी डॉ. हळदवणेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभली. सुरुवातीला एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हास्तरीय पुष्परचना स्पर्धा आणि अनोख्या अशा पुष्परचना व इनडोअर गार्डन प्रदर्शनाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी यांनी कुलसचिव डॉ. हळदवणेकर यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रस्तावनेमध्ये डॉ. माळी यांनी महाविद्यालयाची सकारात्मक वाटचाल व भविष्यातील उपक्रम यावर भाष्य केले. कुलसचिव यांच्या हस्ते २०२४ या वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अशोक सावंत व भिवा माळकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पुष्परचना स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. बांदेकर कला महाविद्यालय येथील प्राध्यापक सिद्धेश नेरुरकर व संतोष मोरजकर यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले व उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले. कुलसचिव यांच्या हस्ते परीक्षकांना गौरविण्यात आले.
कुलसचिव डॉ. हळदवणेकर यांनी सर्व मुळदे परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भविष्यात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. टाकावू दगडातून आकर्षक कलाकृती बनविणाऱ्या विद्यार्थिनींना स्वतःकडून बक्षीस जाहीर केले. प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. संदीप गुरव यांनी केले.