Pune School: पुण्यातील शाळेत कपडे बदलताना विद्यार्थीनीचं रेकॉर्डिंग केल्यानं खळबळ! शिपायाला अटक
esakal January 08, 2025 10:45 PM

पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिपायानं चेजिंग रुममध्ये मोबाईल ठेवून त्यातील कॅमेरॅद्वारे विद्यार्थीनीचं चित्रीकरण केल्यानं खळबळ उडाली आहे. या शिपायाविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला अटकही झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ६ जानेवारी रोजी घडला. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूम मध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूममध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला.

दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला. घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला.

मात्र, हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग साठीच केला असल्याची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्याव्यस्थापान ने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली.

याप्रकरणी आरोपीच्याविरोधात पॉक्सोसह बीएनएस कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.