ग्रीनलँड, पनामा कालवा ट्रम्प यांना ताब्यात का घ्यायचा आहे? अमेरिकेची काय आहे व्यूहरचना?
BBC Marathi January 09, 2025 03:45 PM
Reuters राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रोज नवनवीन विधाने करत आहेत.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वादांशी घनिष्ठ नातं आहे.

राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासून ट्रम्प सातत्यानं विधानं करत आहेत.

कॅनडा, ग्रीनलँड आणि पनामा कालवा यांच्यासंदर्भात ट्रम्प यांच्या वक्तव्यांमध्ये सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अमेरिकेला या प्रदेशावर नियंत्रण मिळवायचं असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांची यासंदर्भात काय भूमिका आहे, अमेरिकेच्या दृष्टीनं त्याचं काय महत्त्व आहे, संबंधित देशांची काय भूमिका आहे आणि नव्या भूराजकीय समीकरणांमध्ये याचं महत्त्व काय आहे, याचा ऊहापोह करणारा हा लेख...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं शेजारी देशांवर वक्तव्यं करत आहेत. या देशांचा समावेश अमेरिकेत करून घेण्याची भूमिका ते मांडत आहेत.

एका बाजूला ते कॅनडाचा समावेश अमेरिकेत करण्याबाबत विधानं करत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांनी ग्रीनलँड आणि पनामा कालवा देखील अमेरिकेच्या ताब्यात घेण्याचं वक्तव्य केलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले होते. तेव्हापासून ते सातत्यानं करत असलेल्या वक्तव्यांवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आता कुठे प्रतिक्रिया दिली आहे. तर ग्रीनलँड आणि पनामा यांनी ट्रम्प यांची भूमिका आधीच फेटाळली आहेत.

ग्रीनलँडचे पंतप्रधान म्युट एगड यांनी गेल्या महिन्यातच स्पष्ट केलं होतं की ग्रीनलँडची मालकी तिथल्या स्थानिकांची आहे आणि तो प्रदेश विक्रीसाठी नाही.

ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे की ग्रीनलँड हे एक स्वतंत्र राष्ट्र नाही. तर तो डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे.

BBC

BBC ग्रीनलँडबद्दल ट्रम्प यांची भूमिका काय?

अमेरिकेचे नव्यानं निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की ग्रीनलँड आणि पनामा कालवा या दोघांवर अमेरिकेचा ताबा असला पाहिजे. कारण ते अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूपच आवश्यक आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या त्यांच्या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं होतं की राष्ट्रीय सुरक्षा आणि जगात कुठेही वावरण्याच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेला वाटतं की ग्रीनलँडवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर ग्रीनलँडनं लगेचच त्यावर प्रतिक्रिया दिली. ग्रीनलँडचे पंतप्रधान म्यूट एगड म्हणाले, "आम्ही विकाऊ नाही आणि आम्ही कधीही विकले जाणार नाही."

त्यानंतर ते म्हणाले, "स्वातंत्र्यासाठीच्या आपल्या प्रदीर्घ संघर्षाला आपण विसरता कामा नये. अर्थात सर्व जग आणि विशेषकरून आपल्या शेजाऱ्यांबरोबर सहकार्य आणि व्यापार करण्यासाठी आपण खुलं असलं पाहिजे."

ग्रीनलँडची पुन्हा एकदा चर्चा

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याची भूमिका मांडली आहे. त्यावर डेन्मार्कनं देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं की स्वायत्त अशा डॅनिश प्रदेशाला (ग्रीनलँड) किंवा पनामा कालव्याला ताब्यात घेण्यासाठी ते आर्थिक किंवा लष्करी शक्तीचा वापर करतील का?

या प्रश्नावर टम्प यांनी उत्तर दिलं की, "नाही, मी या दोन्हीबाबत तुम्हाला खात्री देऊ शकत नाही."

अर्थात यानंतर ते म्हणाले की अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेसाठी त्यांना हे दोन्ही हवे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी ग्रीनलँडचा दौरा केल्यानंतर ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत वक्तव्यं दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर ग्रीनलँडची राजधानी असलेल्या नूक इथं आले आहेत. ट्रम्प ज्युनियर म्हणाले की लोकांशी चर्चा करण्यासाठी ते वैयक्तिक दौऱ्यानिमित्त इथं आले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांना भेटण्याचं त्यांचं कोणतंही नियोजन नाही.

Getty Images

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर आतापर्यंत ग्रीनलँडच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया आली होती. मात्र मंगळवारी (7 जानेवारी) डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला. मेटे म्हणाले की त्यांना असं वाटत नाही की ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी अमेरिका लष्करी आणि आर्थिक शक्तीचा वापर करेल.

त्याचबरोबर मेटे फ्रेडरिक्सन असंही म्हणाले की अमेरिकेनं आर्क्टिक प्रदेशात मोठा रस दाखवल्याचं ते स्वागत करतात. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की ही गोष्ट ग्रीनलँडमधील जनतेचा 'सन्मान' राखत केली गेली पाहिजे.

ट्रम्प ज्युनियर यांच्या ग्रीनलँड दौऱ्याबाबत देखील पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की ग्रीनलँड हे ग्रीनलँडर्सचं आहे आणि तिथले स्थानिक लोकच फक्त त्यांचं भवितव्य ठरवू शकतात.

त्यांनी या गोष्टीला देखील पाठिंबा दिला की 'ग्रीनलँड विक्रीसाठी नाही.' अर्थात त्यांनी या गोष्टीवर देखील भर दिला की डेन्मार्कनं अमेरिकेबरोबर चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची आवश्यकता आहे, कारण दोन्हीही नाटो संघटनेचे सदस्य देश आहेत.

ट्रम्प यांना ग्रीनलँड का हवं आहे?

उत्तर अमेरिकेतून युरोपला जाण्याचा जो सर्वात जवळचा मार्ग आहे, त्या मार्गावर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. त्याचबरोबर ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचं मोठं अवकाश केंद्रदेखील आहे. साहजिकच ग्रीनलँडचं महत्त्व मोठं आहे.

अमेरिका प्रदीर्घ काळापासून ग्रीनलँडला व्यूहरचनात्मक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं मानते. रशियाबरोबरच जेव्हा अमेरिकेचं शीत युद्ध सुरू होतं, तेव्हा अमेरिकेनं थ्यूलीमध्ये एक रडार तळ देखील उभारला होता.

त्याचबरोबर ग्रीनलँडमध्ये विपुल खनिज संपत्ती आहे. बॅटरी आणि हाय-टेक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक दुर्मिळ खनिजांचा मोठा साठा ग्रीनलँडमध्ये आहे.

ट्रम्प यांना वाटतं की रशिया आणि चीनच्या सर्व ठिकाणी वावरणाऱ्या जहाजांवर देखरेख करण्यासाठी लष्करी दृष्टीकोनातून ग्रीनलँड खूपच महत्त्वाचं आहे.

ट्रम्प यांनी मंगळवारी (7 जानेवारी) पत्रकारांना सांगितलं की, "मी मुक्त जगाच्या संरक्षणाचा मुद्दा मांडतो आहे."

Getty Images अमेरिकन उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी या विमानाने नूकला भेट दिली.

ग्रीनलँडचं क्षेत्रफळ जवळपास 21 लाख चौ. किलोमीटर असलं तरी तिथली लोकसंख्या फक्त 57 हजार आहे. अनेक प्रकारची स्वायत्तता असलेल्या ग्रीनलँडची अर्थव्यवस्था डेन्मार्ककडून दिल्या जाणाऱ्या सब्सिडीवर अवलंबून आहे. ग्रीनलँड हे किंगडम ऑफ डेन्मार्कचा एक भाग आहे.

ग्रीनलँडच्या 80 टक्के भूभागावर जवळपास 4 किलोमीटर जाडीचा कायमस्वरुपी बर्फाचा थर असतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आर्क्टिक प्रदेशात येणाऱ्या ग्रीनलँडला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या जसं ट्रम्प यांच्या यासंदर्भातील वक्तव्यांना विरोध करण्यात आला आहे की त्यांची भूमिका नाकारण्यात आली आहे, तेव्हादेखील ट्रम्प यांच्या भूमिकेला याचप्रकारे नाकारण्यात आलं होतं.

अर्थात, ग्रीनलँड विकत घेण्याची सूचना मांडणारे डोनाल्ड ट्रम्प हे काही अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष नाहीत. 1860 च्या दशकात अमेरिकेचे 17वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली होती.

पनामा कालव्यासंदर्भात काय चर्चा होते आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे की पनामा कालव्याचा वापर करण्यासाठी पनामा देश अमेरिकेकडून जास्त शुल्क आकारतो आहे. त्यामुळे पनामा कालवा ताब्यात घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की हा कालवा अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

याव्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे की पनामा कालव्यावर चीनच्या सैनिकांचं नियंत्रण आहे. चीनी सैनिक बेकायदेशीररित्या या कालव्याचं व्यवस्थापन चालवत आहेत.

मात्र पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोसे राउल मुलिनो यांनी ट्रम्प यांचे दावे 'निरर्थक' असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की पनामा कालव्यात चीनचा कोणताही हस्तक्षेप नाही.

पनामा कालवा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराला जोडतो. या कालव्याच्या तोंडावर असणाऱ्या दोन बंदरांचं व्यवस्थापन हॉंगकॉंगस्थित सी के हचिसन होल्डिंग्स ही कंपनी पाहते.

पनामा कालवा 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला बांधला गेला होता. 1977 पर्यंत या कालव्याचं नियंत्रण अमेरिकेकडेच होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या मध्यस्थीनं हा कालवा पनामा देशाच्या ताब्यात देण्यात आला होता.

Getty Images पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोसे राउल मुलिनो म्हणाले आहेत की त्यांचा देश पनामा कालव्यावरील नियंत्रणाबाबत कोणतीही चर्चा करणार नाही

यानंतर 1999 मध्ये या कालव्याचं नियंत्रण पूर्णपणे पनामा देशाकडे गेलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, "पनामा कालवा पनामा देशाच्या ताब्यात देणं ही एक मोठी चूक होती. जिमी कार्टर चांगले व्यक्ती होते. मात्र ती एक मोठी चूक होती."

याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाचा समावेश अमेरिकेत करण्याबद्दल देखील वक्तव्य केलं आहे. त्यांनी कॅनडाला आधीच धमकी दिली आहे की कॅनडानं अमेरिकेला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा वाढवावी, नाहीतर कॅनडाच्या सामानावर टॅरिफ (आयात शुल्क) लावला जाईल.

मार-आ-लागो मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. त्यात ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त करत म्हटलं होतं की मेक्सिको आणि कॅनडातून अमेरिकेत अंमली पदार्थ येत आहेत.

ट्रम्प यांनी कॅनडाप्रमाणेच मेक्सिकोवर सुद्धा 25 टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकेच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या मेक्सिकोला लागून असलेल्या सीमेच्या तुलनेत अमेरिका-कॅनडा सीमेवर अंमली पदार्थ जप्त करण्याचं प्रमाण फारच कमी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.