मुंबई : लोकल ही मुंबईकरांची पहिली जीनववाहिनी आहे. मागील अनेक दशकांपासून रेल्वे प्रवाशांना सुविधा देत आहे. सद्यस्थितीत लाखोंच्या संख्येने प्रवासी लोकलनं प्रवास करत आहेत. पण वाढत्या प्रवासी गर्दीमुळे आणि लोकलचे बिघडलेल्या गणितामुळे प्रवाशांना धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. परिणामी अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. पण आता रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना रेल्वे नुकसान भरपाई देणार आहे. यासंदर्भातील आदेश स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार, 2010 साली झालेल्या लोकल अपघाताचा तब्बल 14 वर्षांनी निकाल लागला असून रेल्वे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 8 लाखांची नुकसान भरपाई देणार आहे. (compensation of 8 lakh for family of local train passenger who fell due to overcrowding of train)
मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दीमुळे कित्येक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. याच गर्दीमुळे जीव गमावलेल्या एका व्यक्तीच्या आई-वडिलांना 8 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 8 मे 2010 रोजी गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनमधून एक प्रवासी खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात कोर्टाने प्रवाशांच्या आई-वडिलांना 4-4 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
– Advertisement –
मिळालेल्या माहितीनुसार, नासिर अहमद खान नावाचा प्रवासी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वडाळा ते सँडहर्स्ट रोड-चिंचपोकळी असा प्रवास करायचा. 2010 साली याच मार्गावर प्रवास करण्यासाठी नासिर घरातून सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास निघाला. नेमकं त्याचदिवशी लोकलला प्रचंड गर्दी होती. त्यावेळी लोकलने प्रवास करत असताना धक्काबुक्की झाली आणि त्यातच नासिर ट्रेनमधून खाली कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. प्रवाशांनी त्याला जेजे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्यावेळी रेल्वे प्रवासादरम्यान मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजाताच नासिरच्या आई-वडिलांनी न्यायालयाची पायरी चडली होती. पण रेल्वे न्यायधिकरणाने नासिरच्या आई-वडिलांचा दावा फेटाळून लावला होता. त्यावेळी न्यायधिकरणाकडून काही सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार, नासिर हा खरंच लोकल प्रवासी होता का? रेल्वे कायद्यानुसार ही घटना ‘अयोग्य घटना’ म्हणून पात्र आहे का? दरम्यान, नासिरच्या अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल न देणे आणि जप्त केलेले रेल्वे तिकीट न मिळाल्याबद्दल न्यायाधिकरणाने शंका व्यक्त केली होती. न्यायमूर्ती फिरदौस पूनीवाला यांनी चौकशीची पडताळणी केली. तसंच, मृत्यू प्रमाणपत्र, पंचनामा रिपोर्ट आणि पोस्टमार्टम रिपोर्टसह अनेक प्रमुख साक्षीदार आणि पुरावे तपासल्यानंतर नासिरचा खरंच ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता, असा निष्कर्ष काढला.
– Advertisement –
त्यावेळी समोर आलेल्या नासिरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, नासिरच्या शरीरावरील जखमा या चालत्या ट्रेनमधून पडल्याच्याच आहेत. त्यामुळं रेल्वे न्यायाधिकरणाचा दावा फेटाळण्यात आला आहे. यावेळी जे पुरावे समोर आले होते त्यामध्ये सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात ड्युटीवर तैनात असलेल्या एका पोलिस कॉन्सटेबलचा समावेश होता. यावेळी त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सकाळी जवळपास 9.45 वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता आणि त्याला इतर प्रवासी टॅक्सीतून रुग्णालयात नेले होते. ते लगेचच रुग्णालयात पोहोचले आणि तिथल्या डॉक्टरांसोबत चर्चा केली’, असे त्याने म्हटले होते.
दरम्यान, नासिरच्या वडिलांनी दाखल केलेली याचिकेची न्यायालयाने दखल घेतली. त्यात म्हटलं होतं की, नासिर दररोज ट्रेनने प्रवास करायचा त्याच्याकडे मासिक पासदेखील होता. त्याव्यतिरिक्त नासिर हा एकटाच त्याच्या आई-वडिलांचा आधार होता. त्यामुळे, ‘याप्रकरणी आता रेल्वेने त्याच्या आई-वडिलांना चार-चार लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई द्यावी. त्याचबरोबर नुकसानभरपाई देण्यासाठी 8 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर 7 टक्के अतिरिक्त व्याजदेखील देण्यात यावा’, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे तब्बल 14 वर्षांनी नासिरच्या आई-वडिलांना न्यायालयाकडून न्याय मिळाला.
हेही वाचा – Torres Scam : टोरेसची तीन बँक खाती गोठवली, तक्रार करण्यासाठी गुंतवणूकदारांची दादर पोलिसांत गर्दी