सध्या अनेक प्रकारच्या गुंतवणुकींमध्ये परताव्याचं प्रमाण कमी झालंय. म्हणजे PF चा व्याजदर गेला काही वर्षांत कमी झालाय.
सरकारी योजनांचे, FD चे व्याजदर कमी झाले आहेत. बाँड्सच्या गुंतवणुकीवर देखील ठराविक दराने व्याज मिळत आहे. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीत तर धोका असतोच आणि तो बाजारही वरखाली होत राहतो.
अशात जर तुम्हाला कुणी सांगितलं की, आमच्या योजनेत पैसे घाला, आम्ही तुम्हाला वर्षभरात पैसे तिप्पट करून देऊ. तर काय कराल तुम्ही?
अशी अनेक प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना सध्या आपल्या आजूबाजूला आहेत. तसेच लोक या योजनांना बळीही पडतात. अशा योजनांच्या माध्यमातून लोकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला जातो.
या योजना काम कशा करतात? आणि यातल्या धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या?
चार्ल्स पाँझी आणि पाँझी स्कीम्सया योजनांना म्हटलं जातं 'Ponzi Scheme'. हे नाव आलंय चार्ल्स पाँझी या व्यक्तीवरून. 1920 च्या दशकात अमेरिकेत या चार्ल्स पाँझीने अतिशय चढ्या दराने परतावा देणारी गुंतवणूक योजना आणली आणि अनेक लोक यात फसले.
अशी योजना आणणारा हा पहिला माणूस नव्हता; पण हा स्कॅम खूप गाजला आणि पुढे या योजनांना पाँझीचंच नाव पडलं.
Getty Images इटलीत जन्मलेल्या चार्ल्स पाँझीने अमेरिकेत अतिशय चढ्या दराने परतावा देणारी गुंतवणूक योजना आणली होती. पाँझी स्कीम्स कशा काम करतात?सुरुवात होते एक माणूस वा कंपनीपासून.
ही व्यक्ती सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना आपल्या योजनेत पैशांची गुंतवणूक करण्यासाठी तयार करते. आणि या लोकांना ठराविक काळाने त्यावर घसघशीत परतावाही दिला जातो.
इतके रिटर्न्स मिळाल्याने स्कीमची चर्चा होते. त्यामुळे, आणखी गुंतवणूकदार येतात. नवीन गुंतवणूकदारांच्या पैशांतून जुन्या लोकांना परतावा दिला जातो.
लोकांना वाटत असतं, आपण पैसे शेअर बाजारात वा कोणत्यातरी उद्योगात गुंतवलेत आणि त्यातून आपल्याला परतावा मिळतोय. पण प्रत्यक्षात असा कोणताही व्यवसाय किंवा शेअरबाजार योजना अस्तित्वातच नसते.
Getty Images पाँझी योजनांमध्ये नवीन गुंतवणूकदारांचे पैसे जुन्या गुंतवणूकदारांना परतावा म्हणून दिले जातात.ज्यावेळी नवीन गुंतवणूकदार येणं कमी होतं, येणारा पैसा आटतो, तेव्हा आधीच्या लोकांना पैसे देणं कमी होत जातं आणि थांबतं.
स्कीम कोलमडते. लोकांच्या लक्षात येतं की आपण फसलो. तोवर पहिला माणूस गाशा गुंडाळून गेलेला असतो.
यातलाच एक प्रकार - पिरॅमिड स्कीम्स
यामध्ये गुंतवणूकदारांना सांगितलं जातं की तुम्ही जितके जास्त नवीन गुंतवणूकदार आणाल तितके जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळतील. सुरुवातीला यातून पैसे मिळतात. पण नंतर नवीन लोक येणं कठीण होतं आणि आधीच्यांना पैसे मिळणं कठीण होतं आणि मग ही स्कीम बंद पडते.
टोरेस ज्वेलरी स्कॅम, विशाल फटे योजना, क्रिप्टो स्कॅम, कडकनाथ कोंबडी घोटाळा, इमू घोटाळा.... नावं वेगवेगळी आहेत. पण या सगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये आजवर आढळलेली समान गोष्ट म्हणजे 'कमी काळात प्रचंड मोठ्या दराने परतावा देण्याचं आश्वासन' होय.
फसव्या योजनांमधल्या धोक्याच्या घंटा काय आहेत?बाजारात गुंतवणुकीच्या अनेक योजना अस्तित्वात आहेत. मात्र, त्यातल्या कोणत्या योजना खऱ्या आणि कोणत्या फसव्या, हे आपण कसं ओळखणार?
तर ज्या योजना फसव्या असतात, त्या योजनांच्या स्वरुपामध्येच त्याबाबतचा धोका लपलेला असतो. आता आपण पाहूयात की, फसव्या योजनांमधल्या धोक्याच्या घंटा काय आहेत ?
Getty Images इतरांपेक्षा जास्त परतावा'इतरांपेक्षा जास्त परतावा देऊ...' हे वाक्य कुणाकडूनही ऐकलं तर तुमच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजायलाच हवी. म्हणजे साधं आपण भाजी घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कांदे-बटाटे वा भाज्यांचे साधारण काय दर आहेत, हे माहिती असतं.
त्यापेक्षा 30-40 रुपये जास्त भावाने कोणी हीच गोष्ट विकायला लागलं तर आपण याच्याकडे हीच भाजी इतकी महाग का, असा विचार करतो.
आणि तीच गोष्ट कोणी अगदीच स्वस्तात द्यायला लागलं तरीही आपल्या डोक्यात शंका येते की ही भाजी शिळी तर नाही ना? ही फळं बेचव किंवा खराब व्हायला तर लागली नाहीत ना? कदाचित म्हणूनच हा इतक्या स्वस्तात ती विकत असावा का?
भाजी घेताना जर आपण इतका विचार करतो तर मग तोच आपले पैसे गुंतवताना हाच विचार करायला नको का?
साधी गोष्ट अशी आहे की, वर्षांनुवर्षं अस्तित्वात असणाऱ्या बँकांना जर तुम्हाला ठराविक दरानेच व्याज देणं जमतंय वा परवडतंय तर मग आताच आलेल्या कुणा माणसाला किंवा कंपनीला इतके रिटर्न्स देणं कसं काय शक्य होत असेल? ही शंका तुमच्या डोक्यात यायलाच हवी.
आणखी लोक आणण्याचा आग्रहतुम्ही बँकेत पैसे ठेवता, तेव्हा ते तुम्हाला आणखी चार लोकं आणा मग तुम्हाला जास्त पैसे देतो, असं सांगतात का? नाही.
Getty Images तुमचे पैसे योजना कुठे गुंतवणार हे तुम्हाला सांगितलं जातंय का?फसव्या योजना मात्र यासाठी आग्रही असतात. तुम्ही जितक्या जास्त लोकांना आणाल तितका जास्त परतावा तुम्हाला मिळेल, असं सांगितलं जातं.
कधीकधी आमच्या सेमिनारला या, लगेच पैसे गुंतवायची गरज नाही, फक्त ऐकायला या, असंही सांगितलं जातं. पैसे काढून घ्यायचे आहेत, असं सांगितलं तर काही तरी कारणं देऊन तुम्हाला थांबवून ठेवलं जातं. ही आहे धोक्याची दुसरी घंटा.
गुंतवणूक परताव्याची हमीकोणत्याही वित्तीय संस्था त्यांच्या गुंतवणूक योजनांवर किती परतावा मिळेल याची हमी देत नाहीत. Investment Returns हे शेअरबाजार, नियमावली आणि इतर गोष्टींवर अवलंबून असतील हे कायमच सांगितलं जातं. म्हणूनच जाहिरातींमध्ये एक अॅस्ट्रिक म्हणजे * ही खूण करून याकडे लक्ष वेधलेलं असतं.
'Investments are subject to market risks' असा इशारा जाहिरातींतूनही दिला जातो.
याच्या बरोबर उलट गोष्ट फसव्या योजना करतात. त्यामुळे तुम्हाला इतके टक्के रिटर्न्स देतो, असं छातीठोकपणे कोणी सांगायला लागलं तर सावध व्हा.
Getty Imagesयाविषयी बोलताना शेअरबाजार अभ्यासक सीए निखिलेश सोमण सांगतात, "सेबी नियमांनुसार शेअरबाजारात परताव्याची अपेक्षा जरी तुम्ही ठेवत असाल तरी ती गँरंटेड रीटर्न देण्याची अशी कुठलीही तरतूद नाही. किंबहुना जर कुणी तुम्हाला गॅरंटेड परतावा देऊ असं सांगत असतील, तर सावधान.
"कारण शेअर बाजाराच्या नियमाप्रमाणे तसेच सेबी नियमांनुसार कोणीही खात्रीशीर परतावा देऊ शकत नाही. म्युच्युअल फंडही 'Subject to Market Risks' म्हणजे शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असतात. मग शेअरबाजारात कोण बरं असा गॅरंटेड परतावा देईल?"
"जर असे काही लोक तुमच्याकडे येऊन भेटत असतील, तुम्हाला योजना सांगत असतील तर कृपया सावधान रहा. अशा अमिषांना, प्रलोभनांना बळी पडू नका. नाहीतर कालांतराने तुमचे पैसे गेलेलेच तुम्हाला दिसतील," सोमण सांगतात.
योजना किंवा व्यक्तीची विश्वासार्हताएखादी गाडी किंवा बाईक घ्यायची असेल, तर आपण शोरूम कुठे आहे, कधीचं मॉडेल आहे, मायलेज किती आहे, सर्व्हिस सेंटर कुठे आहे आणि ती गाडी ओळखीच्या कोणी वापरलीय का? या सगळ्या गोष्टी तपासतो. बरोबर? मग कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करतानाही फक्त किती मोठा परतावा मिळतोय हे बघून चालणार नाही.
ही योजना देणारी व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या भागात कधीपासून आहे, तिची नोंदणी सेबीसोबत किंवा कोणत्या ब्रोकिंग फर्म्स किंवा वित्तीय संस्थांकडे आहे का, तुम्हाला ऑफर होत असलेली योजना सेबी, IRDA नोंदणीकृत आहे का, या गोष्टी तपासायलाच हव्यात.
Getty Imagesत्या व्यक्तीचे कागद, लेटरहेड, नावाचे शिक्के यावर विश्वास ठेवू नका. त्यात कोणते नोंदणी क्रमांक आहेत का, हे तपासा.
सगळ्या मान्यताप्राप्त संस्था त्यांच्या गुंतवणूक पद्धती म्हणजे तुमचे पैसे कशात गुंतवले जाणार याविषयी आणि योजनांमधल्या धोक्यांविषयी अगदी स्पष्टपणे सगळं सांगतात. तुम्हाला ऑफर देत असलेली व्यक्ती गुंतवणूक पद्धत आणि त्यातले धोके सांगतेय का, हे नक्की बघा.
फसवणूक झाल्यास तक्रार कराआपल्याला कोणीतरी लुबाडलं हे सांगणं लाजीरवाणं असतं आणि म्हणून ते कोणाला सांगितलं जात नाही आणि परिणामी इतर लोकही त्याच योजनेला बळी पडतात.
त्यामुळे तुम्हाला जर कोणी फसवलं असेल तर त्याची रीतसर तक्रार दाखल करा. जेणेकरून ही व्यक्ती इतरांना त्याच मार्गाने फसवू शकणार नाही.
त्याचवेळी जर एखादी व्यक्ती बोगस आहे, फ्रॉड आहे हे गुंतवणूक करायच्या आधी लक्षात आलं तर त्याबद्दलही इतरांना माहिती द्या. याविषयीही पोलिसांचं वा सेबीचं लक्ष वेधा. म्हणजे अशी योजना मोठीच होऊ शकणार नाही.
या काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपली गुंतवणूक सुरक्षित राहू शकेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)