संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Inshorts Marathi January 08, 2025 10:45 PM

मुंबई, दि. ८ :- एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाही, मोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या शहरांमध्ये उत्तम अशी संग्रहालये आहेत. असेच एक उत्तम संग्रहालय आपण खुले करत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

संग्रहालयाच्या माध्यमातून त्या देशाची, शहराचीसंस्कृती, लोक जीवन आणि इतिहास कळतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश आहे. आतापर्यंत झालेला विकास आणि त्यासाठी झालेली स्थित्यंतरे भावी पिढीला समजणे आवश्यक आहे. भारत हा जगातील सर्वात जुनी संस्कृती आजही नांदत असलेला एकमेव देश आहे. आपला देश संस्कृतीची खाण आहे. ती आपण जपली पाहिजे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. भाऊ दाजी लाड हे डॉक्टर होते. पण त्यांनी आपले सर्व जीवन समाजासाठी समर्पित केले. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी या संग्रहालयातील अनेक वस्तू दिल्या आणि गोळाही केल्या. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून या संग्रहालयास ५० वर्षापूर्वी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. आज ५० वर्षानंतर त्यांच्या नावाचे हेच संग्रहालय नव्या रुपात जनतेसाठी खुले करताना मोठा आनंद होत आहे. पर्यटकांसाठी हे संग्रहालय एक आकर्षण असेल. यातील वस्तू, दुर्मिळ छायाचित्रे या माध्यमातून लोकांना एक वेगळा अनुभव मिळेल. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो असेही श्री.फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, आमदार राजहंस सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अमित सैनी, तस्मिन मेहता यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.