पिंपरी, ता. ७ ः प्रवासी घेण्यासाठी आणि सोडविण्यासाठी खासगी प्रवासी बस चालक कुठेही वाहने थांबवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अशा अपघाताला निमंत्रण देणाऱ्या बेकायदा थांब्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा वाहतूक विभागाने प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड शहर आणि उपायुक्त वाहतूक विभाग यांच्याकडे केली आहे. याबाबत राष्ट्रवादी वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात विनोद वरखडे यांनी म्हटले आहे की, ‘पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी काही थांबे निश्चित केले आहेत. मात्र, बसचालक व खासगी प्रवासी घेण्यासाठी कुठेही थांबत आहेत. त्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणात होत असून, वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दैनंदिन वाहतूकदारांना त्यांचा फटका बसतो. नागरिक आपल्या गावी ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने खासगी बसचा वापर करतात. निगडी, तळवडे, चिखली, भोसरीतून बस ये-जा करतात, ते करत असताना ते कुठेही आपली वाहने थांबवतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. काही महिन्यापूर्वीच वाहतूक विभागाने बस व पिकअप आणि ड्रॉप निश्चित केले होते, तरीही बस चालक प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कुठेही बस थांबवत असतात. त्यामुळे अपघातात वाढीस कारण ठरत आहे. तरी यावर त्वरित कारवाई करावी.