Lawyer Strike : वकील संघाचे 'लेखणी बंद' आंदोलन; पोलिसांनी वकिलांची बदनामी केल्यावरून मोर्चा
esakal January 08, 2025 11:45 PM

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा वकील संघाचे सभासद अॅड. सिद्धार्थ काशिनाथ बनसोडे आणि अॅड. किशोर उत्तमदास वैष्णव यांच्यावर सातारा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी चुकीचा गुन्हा नोंद केला. दोन्ही वकिलांची पोलिसांनी बदनामी केली, असा आरोप करून जिल्हा वकील संघातर्फे एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे मंगळवारी (ता. सात) जिल्हा न्यायालयात शुकशुकाट पसरला होता.

पोलिसांच्या चुकीच्या कारवाईविरोधात जिल्हा वकील संघातर्फे जिल्हा न्यायालय ते पोलिस आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढून पोलिस आयुक्तांना निवदेन देण्यात आले. आंदोलनात वरिष्ठ वकिलांसह सुमारे १२०० वकिलांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे औरंगाबाद खंडपीठातील व जिल्ह्यातील सर्वच तालुका स्तरावरील न्यायालयातूनही वकील आंदोलनात सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी घटनेचा निषेध म्हणून जिल्हा वकील संघाने लालफिती लावून कामकाज केले.

पोलिस निरीक्षक संग्राम ताठे यांनी वकिलांची माफी मागितली नाही, यासंदर्भातील गुन्हा मागे घेतला नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतरही संबंधित निरीक्षकांवर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक ताठे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून निलंबित करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. संबंधित निरीक्षकावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले.

आंदोलनात जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील, सचिव अॅड. तीर्थराज चावरे, उपाध्यक्ष अॅड. सुनील पडूळ, अॅड. सुवर्णा डोणगावकर, सहसचिव अॅड. करण गायकवाड, अॅड. राहुल भगत, अॅड. संदीप कोल्हे, अॅड. आशिष कोलते, अॅड. कैलास जाधव, अॅड. राहुल जमधडे, अॅड. ममता झाल्टे, महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे सदस्य अॅड.व्ही.डी. साळुंखे यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञांनी सहभाग घेतला.

तालुका स्तरावरही आंदोलन

जिल्हा वकील संघाने लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालुका स्तरावरील पैठण, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड येथील वकील संघानेदेखील लेखणी बंद आंदोलन करून स्थानिक स्तरावर निवेदन दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.