मोहोळ - तब्बल दीड महिन्यांच्या विश्रांती नंतर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत माने पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांनी मोहोळ येथे जनता दरबार सुरू केला आहे. त्यामुळे कार्यकर्ते पुन्हा रिचार्ज झाल्याचे दिसले.
नुकत्याच संपन्न झालेल्या मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार यशवंत माने, विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजू खरे यांच्यात लढत झाली. त्यात राजू खरे यांनी माजी आमदार माने यांचा 30 हजार मतांनी पराभव केला.
दीड महिन्याच्या कालावधीत आत्मपरीक्षण केल्यानंतर आमदार माने कार्यकर्त्या साठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत. बुधवार ता 8 जानेवारी रोजी त्यांनी पहिला जनता दरबार भरविला. त्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर सोलापूर, पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील गावोगावच्या नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज, तहसील कार्यालयातील काही कामे ही गाऱ्हाणी मांडली. ज्या अडचणी तातडीने सुटण्या सारख्या होत्या त्या त्यांनी विविध संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर बोलून मार्गी लावल्या.
येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविण्याचे सुतोवाच त्यांनी केले. मात्र या निवडणुकीतही महायुती झाली तर ठीक अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर या निवडणुका लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान येत्या 17 व 18 तारखेस छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादीचे अधिवेशन होणार आहे. त्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कुणी मदत केली, कुणी विरोध केला याचा लेखाजोखा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.