महाराष्ट्र इंटकच्या कोअर कमिटीची बैठक
शिवडी, ता. ८ (बातमीदार) ः असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम आता महाराष्ट्र इंटकने युद्ध पातळीवर हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इंटकच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी (ता. ७) परळच्या मंझील मजदूर मध्ये पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम होते. इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले की, गेल्या दहा-पंधरा वर्षापेक्षा अधिक काळापासून अनेक उद्योगात असंघटित कामगारांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्याकडून कायम कामगारांचे काम करून घेण्यात येते; वेतन मात्र किमान वेतनापेक्षा कमी मिळते. आरोग्याच्या सोयी आणि सामाजिक हक्कांपासून वर्षानुवर्षे त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे.
अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, इंटकचा कामगार हितकारक कार्यक्रम कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारावर जोर द्यावा लागेल. त्यासाठी जिल्हा स्तरावर दौरे आयोजित करून, सभासद संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कोषाध्यक्ष दिवाकर दळवी, उपाध्यक्ष देवराव सिंग, जी. बी. गावडे, दादाराव डोंगरे, मुकेश तिगोटे, बजरंग चव्हाण आदींनी या वेळी मार्गदर्शन केले.