Laxman Hake on Jarange: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. जरांगेंचं वजन ३५ किलो अन् म्हणतोय घरात घुसून मारीन, अशा शब्दांत त्यांनी हिणवलं आहे. जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून केलेल्या विधानावर हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छ्त्रपती संभाजीनगर इथं ते बोलत होते.
आमच्या नेतृत्वानं बीडमध्ये झालेल्या गुन्ह्यांचं समर्थन केलेलं नाही. परंतू एक नेता आंदोलनामुळं अपघातानं जन्माला आला अन् त्यानं घरात घुसून मारू असं वक्तव्य केलं. पण आम्ही गेली १० दिवस सहन करत होतो. आष्टी पाटोद्याचा आमदार संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं. निवडणूक असताना एक भाषा अन् निवडून आल्यावर एक भाषा. तो निवडून आल्यावर आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर बोलू लागला, अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला.
हाके पुढे बोलताना म्हणाले की, धनंजय मुंडे निवडून येऊ नये म्हणून धस यांनी प्रयत्न केले आता मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत. आम्ही ओबीसींनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे, मुख्यमंत्री पण आम्हीच केलं आहे. पण तुमचा एक आमदार तुमच्याच गृह मंत्रालयावर आक्षेप घेतो. सुरेश धस यांनी जमिनी हडपल्या. उठला-सुटला की सुरेश धस टीव्हीवर, या महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत.
वाल्मिक अण्णा सोबत जसे धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत तसेच शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासोबतही फोटो आहेत. तुमची माणसे निवडून आल्यावर तुम्हाला वाल्मिक अण्णा चालतात आणि अचानक तुम्हाला काय काय सुचते? फक्त धनंजय मुंडे दिसतात.
जर मनोज जरांगेंनी असेच मोर्चे काढण्याचे प्रयत्न केले अन् सुरेश धस आरोप करत राहिले तर त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणार असा इशाराही यावेळी लक्ष्मण हाके यांनी दिला.