साखरखेर्डा : येथील स्थानिक पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत घरफोडी तथा वाटमारी करणाऱ्या सहा अट्टल दरोडेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दरोडेखोरांकडून दोन मोटारसायकल सहा धारदार चाकू, पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
या दरोडेखोरांनी ४ जानेवारी रोजी साखरखेर्डा हद्दीतील साखरखेर्डा ते मेहकर रोडवर फायनान्स कंपनीच्या दोन जणांना अडवून त्यांना धाक दाखवून त्यांच्या जवळील १ लाख ४१ हजार ८६८ रुपयाचा ऐवज लुटला होता.
प्राप्त तक्रारीच्या आधारे, पवन नारायण हागे, रा.कंचनपूर, ता.खामगाव व विश्वजित विनोद वानखेडे हे दोघे ४ जानेवारी रोजी कंपनीचे हप्ते वसूल करून साखरखेर्डाहून मेहकरकडे परतत असताना साखरखेर्डा मेहकर रोडवर साखरखेर्डा शिवारात दोघांनाही दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांना अडवून धमकी दिली.
त्यांच्याकडील १ लाख ४१ हजार रक्कम हिसकावून चोरून नेली होती. यानंतर प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलिसांनी येथील प्रथम एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता आणखी ५ जणांची नावे पुढे आली.
या प्रकरणात पोलिसांनी मंगेश रवींद्र गवई (वय २२), विलास केशव खरात (वय २५), अंकिता दत्तात्रय जगताप (वय २३), आविष्कार तुषार गवई (वय २२), अभिमन्यू रामभाऊ मंडळकर (वय २३) व गणेश दादाराव गवई, (वय २५) सर्व रा.साखरखेर्डा या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कारवाई दरम्यान त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी वापरलेल्या दोन मोटारसायकल ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. चोरीच्या प्रकरणात वापरण्यात आलेली हत्यारे व नगद रक्कम जमा होणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी मागण्यांसाठी कोर्टात हजर करण्यात आले आहे.