वाशी, ता. ८ (बातमीदार) : चीनमध्ये एचएमपीव्हीने थैमान घातले आहे. त्याचा शिरकाव आता भारतातही झाला आहे. कर्नाटक आणि गुजरात या दोन राज्यांत पाच; तर महाराष्ट्रातही दोन रुग्ण आढळले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. याबाबत जनजागृती करण्याबरोबरच खबरदारी म्हणून महापालिका रुग्णालयात १० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. नवी मुंबई शहरात एचएमपीव्हीबाधित रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. नवी मुंबई पालिका रुग्णालयात ज्या ठिकाणी सुसज्ज व्हेंटिलेटर, मॉनिटर, ऑक्सिजन उपलब्ध आहे, अशा रुग्णालयात १० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात येत आहे. शहरात एचएमपीव्ही बाधित रुग्ण आढळला, तर खबरदारी म्हणून महापालिकेच्या रुग्णालयात १० खाटांचे विलगीकरण कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी स्पष्ट केले.