शाहीर अण्णाभाऊ साठे
जयंती तळवडेत साजरी
लांजा ः तालुक्यातील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे शिक्षक गणेश झोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. विद्यार्थिनी आदिती जाधव हिने मनोगत व्यक्त केले. साठे यांच्या कार्याबद्दल सांस्कृतिक विभागप्रमुख प्रकाश हर्चेकर यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक डी. बी. पाटील, नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, स्नेहा कोत्रे व विद्यार्थी उपस्थित होते.
---
वालावलकर ट्रस्टकडून
कोंडमळा शाळेला कपाट
खेड ः तालुक्यातील श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंडमळा-बौद्धवाडी या शाळेला दोन कपाटे देणगी स्वरूपात नुकतीच प्रदान करण्यात आली. दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच वालावलकर ट्रस्टमार्फत चिपळूण, संगमेश्वर, खेड, गुहागर, राजापूर, लांजा या तालुक्यातील जिल्हा परिषदेसह अन्य शाळांना देणगी स्वरूपात विविध शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येते. गेली ३५ वर्ष हा उपक्रम ट्रस्टमार्फत सुरू आहे. कोंडमळा बौद्धवाडी शाळेच्यावतीने ट्रस्टकडे ग्रंथालयातील पुस्तके ठेवण्यासाठी व इतर शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी दोन कपाटांची मागणी करण्यात आली होती. प्रशालेजी गरज ओळखून ट्रस्टमार्फत तत्काळ या शाळेला २५ हजाराची दोन कपाटे सुपूर्द करण्यात आली. या वेळी गावचे सरपंच संतोष राडे, पोलिस पाटील प्रमोद सावंत, ग्रामपंचायत सदस्य दिनेश विचारे, मुख्याध्यापिका प्रियांका सावर्डेकर, वालावलकर ट्रस्टचे प्रतीक मोहिते, राजेश भाटवडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
---
रिपब्लिकन पार्टीतर्फे
गुणीजनांचा सत्कार
रत्नागिरी ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रत्नागिरी या शाखेच्यावतीने साई एजन्सी येथील बहुउद्देशीय जनसंपर्क पार्टी कार्यालयात ज्येष्ठ गुणीजन व उच्चशिक्षितांचा गौरव समारंभ अध्यक्ष विलास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. या वेळी प्रमुख अतिथी अॅड. शिवराज जाधव व डॉ. पद्मजा कांबळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात बुद्धवंदनेने झाली. तालुका चिटणीस उज्ज्वल कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी गौरवमूर्ती डॉ. भक्ती सावंत (एमडी आयुर्वेद) परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉ. कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर अॅड. श्रुती कांबळे यांना अॅड. शिवराज जाधव यांच्या हस्ते गौरवण्यात आले.