पश्चिम द्रुतगती मार्ग रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
मुंबई महापालिकेची मंजुरी; नागरिकांच्या मागणीला यश
जोगेश्वरी, ता. ८ (बातमीदार) ः विकास नियंत्रण नियमावली २०३४ मधील बदलानंतर गोरेगाव (पूर्व) दूधसागर वसाहतीजवळील १८.३० मीटर बाधित रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महारपालिकेने याला मंजुरी दिली असून, येथे वसलेल्या सर्वोदय नगरमधील निवासी व अनिवासी गाळ्यांच्या सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी नागरिकांच्या मागणीनुसार यासाठी संबंधित यंत्रणांकडे बैठका व पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. सर्वोदय नगर येथे महामार्गाची रुंदी ४५ मीटर आहे. या झोपडपट्टीच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे महामार्गाची रुंदी ६१ मीटर आहे. पूर्व व पश्चिम संमत विकास आराखडा २०३४ नुसार सर्वोदय नगर महामार्गाची रुंदी ४१ मीटर असून, येथून जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महामार्गाच्या पूर्वेकडील १८.३० मीटर विकास नियोजित रस्ता व दूधसागर सोसायटीचा रस्ता यांच्या एकत्रित जागेला रस्ता रेषा केल्यानंतर ५६ ते ५८ मीटर रुंदीचे सातत्य राखणे शक्य होणार आहे. त्यामुळे आरे चेक नाक येथे होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊन जलद गतीने प्रवास करणे शक्य होणार आहे.
हा रस्ता रुंद करण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार केला. विधानसभेत तारांकित प्रश्न व लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेचे लक्षही वेधले होते.
वाहतूक कोंडी सुटणार
या ठिकाणी सर्वोदय नगर वसाहत असून, निवासी व अनिवासी मिळून अंदाजे ३०० गाळे आहेत. या गाळ्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन जवळच करण्यात, यावे अशी भूमिका खासदार रवींद्र वायकर यांनी मांडली होती. आता मुंबई महानगर पालिकेने सर्वोदय नगर रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने मोहन गोखले पथ ते आरे चेक नाक येथे दरदिवशी होणारी वाहतूक कोंडी सुटण्यासही मदत होणार आहे.