कोची :
केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात एका घराच्या फ्रीजमधून मानवी कवटी व हाडं मिळाल्याने खळबळ उडाली आहे. चोट्टानिकारा येथील हे घर दीर्घकाळापासून बंद होते. मानवी शरीराचे अवशेष घरातील फ्रीजमध्ये आढळून आले आहेत. या घरात दोन दशकांपासून कुणीच राहत नव्हते. तसेच या परिसराची कुणीच देखरेख करत नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली. चोट्टानिकारा पोलीस स्थानकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी घरात पाहणी केली होती. आता याप्रकरणी विस्तृत तपास सुरू केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर घरातील फ्रीजमध्ये मानवी अवशेष मिळाल्याचे कळताच घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. हे घर कुणाचे आहे, याचा शोध घेतला जात असून परिसरातील लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.