टोकन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ
वृत्तसंस्था/ तिरुमाला
आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत चार भाविकांचा मृत्यू झाला. सकाळपासूनच तिरुपतीच्या विविध तिकीट केंद्रांवर हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शन टोकनसाठी रांगेत उभे होते. बैरागी पट्टिडा पार्क येथे भाविकांना रांगा लावण्यात आली असता घटना घडली. वैकुंठद्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले असल्यामुळे टोकनसाठी हजारो नागरिकांची गर्दी होत आहे.
मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या घटनेत अन्य चार भाविक गंभीर असून त्यांना इस्पितळात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी भाविकांवर नियंत्रण मिळविल्याचे सांगण्यात आले. एकंदर परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून तिरुपती पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुमारे चार हजार लोक दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी परिस्थितीबाबत तातडीची बैठक घेतली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही अधिकाऱ्यांकडून फोनवरून परिस्थितीची माहिती घेतली.
तिरुमला तिरुपती देवस्थानमने गुरुवार, 9 डिसेंबरच्या सकाळपासून 94 काउंटरद्वारे वैकुंठद्वार दर्शनासाठीची टोकन देण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे बुधवारपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अलीपिरी, श्रीनिवासम, सत्यनारायणपुरम, पद्मावतीपुरम येथे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र भाविकांची संख्या मोठी असल्याने रांगेत चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीनंतर अनेक लोक आजारी पडले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.