दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार करा! शिवसेना नेते विनायक राऊतांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळ घेणार अधिकाऱ्यांची भेट
Marathi January 09, 2025 06:24 PM

मध्य रेल्वेने नुकताच दादर ते गोरखपुर आणि दादर ते बरेली अशा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतानाच दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर बंद केल्यामुळे कोकण रेल्वेच्या सर्व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यासोबत ही सेवा बंद केल्याने कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे आर्थिक नुकसानही त्यांना होत आहे. या प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी कोकण रेल्वेच्या प्रवाशांच्या प्रश्नासंदर्भात शिवसेनेन अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे.शिवसेना रेल कामगार सेनेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्यासह गुरुवार दि.9 जानेवारी 2025 रोजी, सायं. 5.30 वा. रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ दादर ते रत्नागिरी तसेच रत्नागिरी ते दादर ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाची भेट घेणार आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

‘कोकण रेल्वेच्या निर्मितीपासून असंख्य असे कोकण रेल्वेचे पॅसेजर जे कोकणवासीय मुंबई आणि मुंबई उपनगर विशेषतः विरार, वसई, बोरीवली, दहिसर, मीरा-भाईंदर या पश्चिम उपनगरातून तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे, भांडुप येथून दादर ते रत्नागिरी पर्यंत कोकण रेल्वेच्या अनेक स्टेशन पर्यंत प्रवास करत असतात. तसेच रत्नागिरीहून सुद्धा मुंबईला येणारे लोक हे या पैसेंजरने दादर पर्यंत येत असतात. या प्रवाशांसाठी एक अत्यंत चांगली अशी सुविधा रेल्वेने कोकणच्या मध्यमवर्गीय जनतेला उपलब्ध करून दिली होती. एक्सप्रेस किंवा मेल ट्रेनच्या तिकिटाचे दर परवडत नसणारे प्रवासी पॅसेंजरने प्रवास करत होते. ही पॅसेंजर बंद झाल्यामुळे त्या सर्व प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून आर्थिक नुकसानही त्यांना होत आहे. त्याचबरोबर या पॅसेंजर वर अवलंबून असणारे आणि ज्यांना रोजगार मिळणारे असे असंख्य छोटे छोटे विक्रेते हे देखील त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनाही आर्थिक नुकसानीचा फटका बसत आहे’, असे या पत्रकात मांडण्यात आले आहे.

पूर्वी ज्या वेळेवर दादर-रत्नागिरी पॅसेंजर सुटत होती त्याच वेळेवरती दादर ते गोरखपुर आणि दादर ते बरेली अशा गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्याचबरोबर पुन्हा दादर ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते दादर ही पॅसेंजर ही पूर्वीच्या वेळेनुसार चालू करावी ही कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि अनेक स्टेशन वरील असणाऱ्या प्रवासी संघटना यांची मागणी असून ती तातडीने सुरू करावी अशी मागणी आम्ही रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळातर्फे करणार असल्याचे पत्रकात स्पष्ट सांगण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.