अनधिकृत बांधकामावर हातोडा
अनधिकृत बांधकामावर श्रीवर्धन नगर परिषदेचा हातोडा
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर) ः श्रीवर्धन नगर परिषद हद्दीतील चौकर पाखाडी येथे पुण्यातील एका धनाढ्याने नगर परिषदेची परवानगी न घेता आरसीसी पद्धतीचे जोते बांधले होते. सदरील बांधकाम काढण्यात यावे, अशी नोटीस नगर परिषदेने बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला पाठवली होती. त्या नोटीसला न जुमानता पुढील बांधकाम सुरू असल्याने अखेर नगर परिषदेकडून सदरील बांधकाम पाडण्यात आले आहे.
श्रीवर्धन येथील चौकर पाखाडी येथे पुणे येथील अमित औरंगाबादकर यांनी खरेदी केलेल्या वाडीत तीन हजार चौरस फुटात नगर परिषद, तसेच नगररचना विभागाकडून परवानगी न घेता बांधकाम सुरू करण्यात आले होते. औरंगाबादकर यांना बांधकाम थांबवण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटिसकडे दुर्लक्ष करून डिसेंबर महिन्यात सेट्रिंग ठोकण्याचे काम सुरू ठेवण्यात आले होते. या जागेवर रिसॉर्ट होत असल्याचे निदर्शनास येत होते. सदरच्या जागा मालकाला नोटीस पाठवूनही उत्तर न मिळाल्याने अखेर जोत्याचे बांधकाम नगर परिषदेने जमीनदोस्त केले आहे.
===================================================================================================
प्रतिक्रिया
जुलै महिन्यात विनापरवानगी बांधकाम व विनापरवाना झाडे तोडल्याचे निदर्शनास आल्यावर नोटीस देऊन बांधकाम थांबविण्यास सांगितले होते, तसेच बांधकामासाठी परवानगी घ्यावी म्हणून सांगितले होते, मात्र मागील १५ दिवसांपासून कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू केले. बांधकाम करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता. या कारणाने नुकतेच एक जेसीबी, सहा कर्मचारी, दोन अभियंता यांच्या देखरेखीखाली अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.
-विराज लबडे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगर परिषद
.................
कर्जत-चारफाटा येथील अनधिकृत दुकाने कृषी विद्यापीठाने हटवली
कर्जत, ता. ९ (बातमीदार) ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे.
चौक-कर्जत मुरबाड रस्त्यालगत चारफाटा परिसरातील विद्यापीठाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणाव अनधिकृत दुकाने थाटण्यात आली होती. याबाबत सदरील दुकानदारांना आपले बस्तान हटवावे, असे सांगण्यात आले होते. दरम्यान, २०२२ मध्ये येथील अनधिकृत दुकाने सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करून जमीनदोस्त केली होती. या वेळी मात्र कृषी विद्यापीठाच्या जागेतील दुकानमालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर न्यायालयाने कृषी विद्यापीठाच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे संबंधित अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. कर्जत कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख भरत वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अभियंता राहुल घाडगे, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, मालमत्ता अधिकारी डॉ. राजू सावळे यांच्यासह विविध शास्त्रज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रायगड पोलिस दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.