मार्केट यार्ड, ता. ९ : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांच्या मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग स्पर्धेला शुक्रवारपासून (ता. १०) प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत व्यापाऱ्यांचे १६ संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. दि पूना मर्चंट चेंबरचे सदस्य असलेले तीनशेहून अधिक व्यापारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयोजक समितीचे सदस्य मुकेश गोयल, जतिन शाह, कुणाल ओस्तवाल यांनी दिली.
गंगाधाम चौकाजवळील ए. के. एस. क्रिकेट अकादमीच्या (नाजूश्री प्रतिष्ठान) मैदानावर दहा ते बारा जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी आठ वाजता महिला क्रिकेटपटू दिशा कासट हिच्या हस्ते आणि अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.