टाटाच्या या कंपनीकडून गुंतवणूकदारांना लाभांशांची भेट, तिमाहीत १२३८० कोटी रुपयांचा नफा
मुंबई : टाटा समूहाची आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस) ने गुरुवारी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीने १२३८० कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ११०५८ कोटी रुपयांपेक्षा हा आकडा १२ टक्के जास्त आहे. तिमाही निकाल जाहीर करताना टीसीएसने भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीने लाभांश देण्याची घाेषणा केली आहे.
महसुलातही वाढ डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ६ टक्क्यांनी वाढून ६३९७३ कोटी रुपये झाला. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल ६०५८३ कोटी रुपये होता. मागील तिमाहीत कंपनीच्या मजबूत एकूण करार मूल्य कामगिरी आणि खर्च व्यवस्थापनामुळे महसूल वार्षिक आधारावर 5.6 टक्क्यांनी वाढला.
लाभांशाची घोषणाटीसीएसने शेअरधारकांना प्रति शेअर १० रुपये अंतरिम लाभांश आणि प्रति शेअर ६६ रुपये विशेष लाभांश देखील जाहीर केला आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख १७ जानेवारी आहे. लाभांश मिळण्याची तारीख ३ फेब्रुवारी आहे. कंपनीचा हा तिसरा अंतरिम लाभांश आहे. टीसीएसचे शेअर्स रेकॉर्ड तारखेला किंवा त्याच्या एक दिवस आधी एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग करतील. एक्स-डिव्हिडंड तारीख हे देखील ठरवते की कोणते भागधारक लाभांश पेमेंट मिळविण्यास पात्र आहेत. टीसीएसने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जून आणि सप्टेंबर या दोन्ही तिमाहीत प्रत्येकी १० रुपयांचे दोन लाभांश जाहीर केले होते. गेल्या १२ महिन्यांत टीसीएसचा लाभांश प्रति शेअर ७५ रुपये होता.
ऑर्डर बुकमध्येही वाढ टीसीएसच्या ऑर्डर बुकमध्येही वाढ झाली आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस कंपनीची एकूण ऑर्डर बुक १०.२ अब्ज डॉलर्स होती. सप्टेंबर तिमाहीत हे ८.६ अब्ज डॉलर्स आणि गेल्या वर्षी याच कालावधीत ८.१ अब्ज डॉलर्स होते.
आज शेअर्सवर परिणाम शेअर बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने हे निकाल जाहीर केले. या निकालांचा परिणाम उद्या म्हणजे शुक्रवारी टीसीएसच्या शेअर्सवर दिसून येईल. गुरुवारी टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण नोंदली गेली. शेअर १.५७ टक्के घसरून ४०४४ रुपयांवर बंद झाला.