आकुर्डी, ता. ९ : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळलेली दिसून येत आहे. गुंडगिरी, बलात्कार, खून, दरोडे, धमकावणे, खंडणीचे प्रमाण वाढले आहे. राजकीय वरदहस्तामुळे जिल्ह्या-जिल्ह्यांत गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ निगडीतील पिंपरी-चिंचवड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवार (ता.९) रोजी जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. ‘आवाज दिला लेकीने, समाज आला लाखाने’, यासारख्या विविध घोषणा आंदोलकांनी दिल्या.
यावेळी नागरी हक्क कृती समितीचे मानव कांबळे, प्रकाश जाधव, संजोग पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक मारूती भापकर, नरेंद्र बनसोडे, शिवशंकर उबाळे, सोमनाथ शेळके, मीना जावळे, प्रताप गुरव, शामराव वीटकर, सुनिता शिंदे, कल्पना गिडडे, शैलजा चौधरी, अजय भोसले, बापू गायकवाड, राजन नायर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, प्रदीप पवार, अरुण पवार, विश्वनाथ जगताप, गणेश देवराम, विशाल मिठे, विष्णू मांजरे, जयंत गायकवाड, नकुल भोईर, संजय जाधव, शहाजी कारकर, शशिकांत औटी, महेश कांबळे, रवींद्र चव्हाण, शांताराम खुडे, संतोषराजे निंबाळकर, संपतराव जगताप, वसंत पाटील इत्यादी मान्यवरांसह अनेक आंदोलक उपस्थित होते. जीवन बोराडे यांनी आभार मानले. यावेळी आंदोलकांकडून विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार जयराज देशमुख यांच्याकडे देण्यात आले.
मागण्या काय होत्या...
- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींना अटक करावी
- देशमुख कुटुंबीय व घटनेचे साक्षीदार यांना पोलिस संरक्षण द्यावे
- न्यायालयातून आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली जावी
- आरोपींच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करावी
- परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी
- राजगुरूनगरमधील लैगिक अत्याचारातील आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी
लक्षवेधक फलक, बॅनर...
आंदोलकांच्या विविध घोषणा आणि फ्लेक्स, बॅनरद्वारे सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामध्ये आरोपी वाल्मीक कराडला फाशी झालीच पाहिजे, ‘आवाज दिला लेकीने, समाज आला लाखाने’, ‘सरकार हा असंतोष पहा, न्याय द्या’, ‘संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला संरक्षण देणाऱ्याला बरखास्त करा, अशा अनेक घोषणा आंदोलकांनी दिल्या.
79249
79250