पुणे - शिवसेनेत फूट पडली असली तरी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहिलो होतो. पण पक्ष नेतृत्वाचे पुण्यात लक्ष नाही. रोज सकाळच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले असून, लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी टीका संजय राऊत यांचे नाव घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी केली.
भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची अल्हाट, भाजपचे सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष राजाभाऊ शेंडगे, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते.
पक्ष प्रवेशामुळे कार्यकर्त्यांची नाराजी व पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष धीरज घाटे नसल्याबद्दल जोशी म्हणाले, कार्यकर्त्यांची नाराजी ही लहानसहान गोष्ट आहे, त्याचा फरक पडत नाही. पक्ष प्रवेशाचा निर्णय कोअर कमिटीमध्ये झाला आहे. शहराध्यक्ष मुंबईतील कार्यक्रमात तसेच पुण्यातील कार्यक्रमात उपस्थित होते.
बाळा ओसवाल म्हणाले, ‘आम्हाला हिंदुत्वाची चाड असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होते. पण काँग्रेससोबत शिवसेना गेल्याने आपले चुकले आहे हे लक्षात आले. रोज सकाळच्या भोंग्यामुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली. पुण्यात पक्ष संघटनेकडे कोणाचेही लक्ष नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना व्यक्ती केंद्रीत असल्याने तिकडे न जाण्याचा निर्णय घेतला.
विशाल धनवडे म्हणाले, पुण्यातील शिवसेनेकडे नेत्याचे लक्ष नाही, वर्षानुवर्षे तेच लोक पदांवर आहेत. हिंदुत्वापासून पक्ष दूर गेल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारी मिळेल अथवा मिळेल, पण आम्ही काम करू, आम्ही आलो म्हणून भाजपमधील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. त्यांनाही उमेदवारी मिळू शकते.
पल्लवी जावळे म्हणाल्या, ‘भाजपमध्ये माझे कोणाशीही वाद नाहीत, पूर्वी मी पक्षातच होते, पण तांत्रिक कारणामुळे मी शिवसेनेत गेले होते. स्वर्गीय गिरीश बापट यांच्या मार्गदर्शन होते. मी परत माझ्या घरी आले आहे याचा मला आनंद आहे.
बापट यांच्या तालमीत तयार झालो
शिवसेनेत असताना मी भाजपवर टीका केली, पण आपण ज्या पक्षात जोपर्यंत आहोत तेथे प्रामाणिकपणे काम कर असे मला गिरीश बापट यांनी सांगितले होते. तो माझ्या कामाचा भाग होता, असे जावळे यांनी सांगितले. २००९ मला मी गिरीश बापट यांच्या निवडणुकीत प्रमुख भूमिका बजावली आहे. भाजप शिवसेना युतीमुळे मी त्यांच्याच तालमीत तयार झालेला हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, असे धनवडे यांनी सांगितले.