सिंधुदुर्गच्या ''खाकी''चा जनतेशी थेट संवाद
esakal January 10, 2025 02:45 AM

सिंधुदुर्गच्या ‘खाकी’ चा जनतेशी थेट संवाद
‘ग्रामसंवाद’ अभियान ः पोलिस-नागरिक सलोखा वाढविण्याचे प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः ग्रामीण भागात एखादा गुन्हा घडल्यास खाकी वर्दी जात होती. बंदोबस्त आवश्यक असल्यास पोलिस गावात येत होते; मात्र आता जिल्ह्यातील खाकी वर्दी थेट ग्रामीण भागात जात जनतेशी संवाद साधणार आहेत. गुन्ह्यांबाबत जनजागृती करतानाच पोलिस विभागामार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी जनतेला देण्यात येणार आहे. यातून पोलिस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील सलोखा वाढून कोणताही गुन्हा घडल्यावर नागरिक पोलिसांकडे निर्भयपणे तक्रार घेऊन यावेत, अशी जवळीकता निर्माण करण्याचा या ''ग्रामसंवादा''तून प्रयत्न केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील सर्व गावांमधील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे अनुषंगाने ९ ते २३ जानेवारी या कालावधीत ''ग्रामसंवाद'' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ग्रामसंवाद उपक्रमामध्ये पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्यामार्फत जास्तीत-जास्त गावांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये गावातील डॉक्टर, समाजसेवक, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कोतवाल, सरपंच, उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक ग्रामस्थ, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, पोलिसपाटील, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी-कर्मचारी, विद्युत विभाग तसेच इतर शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना या ग्रामसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करून याद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.
गावातील उत्सव, धार्मिक वा जातीय तंटे, आरोग्य व स्वच्छता त्याचप्रमाणे अवैध धंदे व इत्तर तक्रारी या समस्यांबाबत चर्चा विनीमय आणि उपाययोजना त्याचप्रमाणे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, रस्ते सुरक्षा व अमली पदार्थांबाबत व्यापक जनजागृती आणि लोकाभिमुख व जनहितार्थ उपक्रम व योजना यासंदर्भात माहिती गावातील सर्व स्तरांतील नागरिकांशी थेट संवाद साधून देण्यात येणार आहे. लोकांना कायद्याचा धाक न दाखविता आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम यापासून कसे सावध राहावे, बदललेले कायदे, गुन्हे करण्यासाठी शोधलेले नवनवीन उपाय याबाबत माहिती दिली जाणार आहे.
..................
चौकट
मनोरुग्ण व्यक्तींसाठी
पोलिसांचा पुढाकार
सद्यस्थितीत सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रस्ते, पर्यटन स्थळी, बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा, कॉलेज परिसर आदी ठिकाणी मनोरुग्ण व्यक्ती फिरताना दिसून येतात. त्यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेस, मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या संकल्पनेतून अशा मनोरुग्ण व्यक्तींचे पुनर्वसन होऊन त्यांची कुटुंबियांसमवेत भेट घडवून आणणे, या प्रमुख उद्देशाने मनोरुग्णांना सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सिंधुदुर्ग पोलिस दलाकडून कायदेशीर प्रक्रिया राबवून शासकीय मनोरुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे मनोरुग्ण व्यक्ती परिसरात दिसून तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
....................

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.