पुणे, ता. ९ : महापालिकेच्या श्री शरदचंद्रजी पवार ई-लर्निंग शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंदिर येथे पार पडला. ‘व्हिक्टरी कार्निव्हल’ या थीमवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील खेळापासून ते यावर्षी भारताने जिंकलेल्या विश्वकपवर आधारित गाण्यांवर नृत्य सादर झाले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमात कलादर्पण कला अकादमीतर्फे विद्यार्थ्यांना पदक, मोनिका चाचर यांना गुणवंत शिक्षिका, तर मुख्याध्यापिका तनुजा बेनके यांना ‘सर्वोत्तम मुख्याध्यापक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट, सामाजिक कार्यकर्ते शरद दबडे, विजय वारी, भूषण बहिरमे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजश्री काकडे, गीतांजली म्हेत्रे यांनी केले. पल्लवी खंडागळे यांनी आभार मानले.