पिंपरी, ता. ९ : कोयत्याचा वापर करून दहशत माजविण्यासह वाहन तोडफोडीच्या घटनांचे प्रमाण काही दिवसांपूर्वी कमी झाले होते. मात्र, मागील आठवडाभरात कोयत्याने हल्ला करण्यासह दहशत माजविण्याच्या काही घटना पाठोपाठ घडल्या. यामुळे कोयता बाळगणारे गुन्हेगार आणि टोळ्या पुन्हा सक्रीय झाल्या की काय ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत. तरीही कोयत्याने हल्ल्यांच्या घटना वाढत आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या उद्देशाने कोयते बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून आणखी कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खून, प्राणघातक हल्ला, वाहनांची तोडफोड यासह दहशत माजवण्यासाठी दांडके, चाकू, तलवार यासह कोयत्यांचा वापर केला जात आहे. मात्र, खून, मारहाण, हल्ला या सारख्या एकूण घटनेतील निम्म्यापेक्षा अधिक घटनांमध्ये कोयत्याचा वापर केल्याचे समोर येते. या कोयता टोळ्यांच्या वेळीच नांग्या ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोयता सहज उपलब्ध
बाजारात कोयता सहज उपलब्ध होतो. मात्र, त्याचा वापर शेती कामासह इतर व्यवसायासाठी न करता काही गुंड प्रवृत्तीचे तरुण गुन्ह्यासाठी त्याचा वापर करत आहेत. या गुन्हेगारांकडून दहशत पसरविणे, हल्ले करण्यासाठी कोयत्याचा वापर होत आहे.
गुन्हेगारांवर बारीक नजर असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. गस्तही वाढविण्यात आली आहे. मागील काही दिवसांत पिस्तुल, कोयते जप्तीच्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या आहेत. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अधिक प्रमाणात कारवाई झाली आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.
- डॉ. विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड
मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. २०२३ मध्ये ७०३ तर २०२४ मध्ये ९२७ शस्त्रांचा त्यामध्ये समावेश आहे.
धारदार शस्त्रे जप्तीची कारवाई
वर्ष कारवाई
२०२२ २५६
२०२३ ७०३
२०२४ ९२७
काही प्रमुख घटना
१ जानेवारी
चिखलीतील पाटीलनगर येथे एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी. कोयत्याने एकमेकांवर वार. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल.
३ जानेवारी
दिघीतील श्रीराम कॉलनी येथे दारू पिण्यासाठी एक हजार रुपयांचा हप्ता मागत दोघांकडून तीन वाहनांची तोडफोड. तसेच हवेत कोयता फिरवत कॉलनीमध्ये दहशत माजवली. त्यामुळे घबराट पसरून नागरिकांनी दारे खिडकी बंद करुन घेतल्या.
३ जानेवारी
हप्ता देण्यास नकार दिल्याने पिंपरीत सराईत गुन्हेगारांच्या कोयता टोळीकडून दुकानदार आणि दुकानातील कामगारांवर कोयत्याने वार. टोळीतील सहा अल्पवयीन मुले पिंपरी पोलिसांकडून ताब्यात.