गंगाखेड: गंगाखेड आगाराची लातूर मुक्कामी बस गुरुवारी (ता.९) सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान परभणी रस्त्यावरील दैठणा येथे आली. यावेळी बसला आग लागली. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. यामुळे खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांसाठी विविध सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु गंगाखेड आगारात भंगार गाड्यांचा लवाजवा जमा झाला आहे. गंगाखेड आगारात कंडिशन नसलेल्या बस राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर सुसाट धावत आहेत.
लातूर येथील मुक्कामी बस एम.एच.२० बी.एल. २६९१ लातूर वरून गंगाखेड मार्गे परभणीकडे जात होती. परभणी रस्त्यावरील दैठणा जवळ चालक महादेव मुंडे यांना डिझेलचा वास आला. त्यामुळे त्यांनी बसच्या खाली उतरून पाहिले. त्यावेळी वाहक चंद्रकांत मामलवार यांना केबिनच्या खाली आगीचा भडका उडाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रवाशांना तात्काळ बसच्या खाली उतरविले. प्रवाशांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.