Vijay Wadettiwar : पराभवानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा मोठा आरोप
GH News January 10, 2025 01:12 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. राज्यात सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा खूप मोठा आरोप केला आहे. त्यांनी थेट कोणाच नाव घेतलेलं नाही, पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. अप्रत्यक्षपणे भाजपला मदत झाल्याच त्यांना सूचित करायच आहे. “नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो. परंतु जागावाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता, तर 18 दिवस प्रचारासाठी, प्लानिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलही प्लानिंग करु शकलो नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. ही अनेक कारण झाली. त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे, जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका नक्की बसला” असं विजय वेडट्टीवर म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, जागा वाटपात तुम्हाला काही शंका आहे का? त्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. कदाचित महाविकास आघाडीत आता यावरुन नव्याने गंभीरस्वरुपाचे आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.

‘बैठकीची वेळ 11 वाजताची, यायच दुपारी 2 वाजता’

“मी म्हटलना, हे प्लानिंग आहे का? इतका वेळ वाया घालवला. बैठकीची वेळ 11 वाजताची, यायच दुपारी 2 वाजता. अनेक नेते उशिरा येत होते. त्यात मी कोणाचा नाव घेणार नाही. यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला. एकेका जागेवरुन वारंवार त्याच त्याच गोष्टी होत गेल्या. कदाचित महाराष्ट्रात मविआचा जागा वाटपाचा घोळ दोन दिवसात संपला असता, तर आम्हाला नक्कीच फायदा झाला असता. 20 दिवस जागावाटपात गेले. वेळ घालवण्यामध्ये षडयंत्र, काही प्लानिंग होतं का? अशी शंका घेण्यास हरकत नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत   मविआला फक्त 46 जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर समाधान मानावं लागलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.