Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचे पाय खोलात, खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग; CID कडून कॉल रेकॉर्डिंगची तपासणी
Saam TV January 10, 2025 05:45 PM
विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणाशी संबंधित पवनचक्की खंडणी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटेच्या मोबाइलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मिक कराडने अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचे कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागली असून आवाजाची तपासणी करणे सुरू झाले आहे.

सुनील केदू शिंदे (वय ४२ वर्षे रा. नाशिक) हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे. सुनील शिंदे यांनाच विष्णू चाटे याने फोन करून वाल्मिक कराडला बोलायचे असल्याचे सांगितले होते. यावेळी वाल्मिक कराडने धमकी दिली होती.

खंडणीच्या फिर्यादीत काय म्हटलंय?

- २९ नोव्हेंबर रोजी सुनील शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटेने फोन केला होता. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत, असे त्याने सांगितले.

- ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा', असे म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी घुले कार्यालयात आला.

- 'काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू', अशी धमकी दिली. 'काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या', असे सांगितले होते. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाइलमध्ये झाले आहे.

- त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. तो आवाज कराड, चाटे यांचाच आहे का ? यासाठी व्हाइस सॅम्पल घेतले जात आहेत.

CID कार्यालयात कराडसोबत आलेल्यांची चौकशी?

हा ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात शरण आला. यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि पांढरी कार होती. ही कार आता सीआयडीने जप्त केली आहे. कारमालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील आता सीआयडीच्या रडारवर आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.