Ladka Bhau Yojana : आता लाडके भाऊ होणार पोरके!
esakal January 10, 2025 02:45 PM

अकोला : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल २ हजार ६८६ प्रशिक्षणार्थींचा (लाडके भाऊ) सहा महिन्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपणार आहे.

त्यामुळे सुमारे दोन हजारांवर लाडके भाऊ पोरके होतील व त्यांची जागा याआधीच अर्ज करणाऱ्या अर्जदारांना संधी मिळेल, परंतु त्यासाठी संबंधित अस्थापनांना कौशल्य विकास विभागाकडे मनुष्यबळाची मागणी नोंदवावी लागेल. प्रत्येक युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवक-युवती आणि त्यांचे पालक जागरूक असतात. राज्य शासन देखील त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते.

युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून भांडवल उपलब्ध करून देते. दरम्यान रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ जुलै २०२४ पासून सुरू केली. त्याअंतर्गत प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या युवकांनी नोंदणी केली. त्यापैकी दोन हजारावर युवकांच्या हाताला काम मिळाले. परंतु आता त्यांचा सहा महिन्यांचा कालावधी संपणार असून त्यांच्या जागी नवीन बेरोजगारांची नेमणूक करण्यात येईल.

पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड?

राज्य सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कार्यान्वित केली. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ हजार ६८६ युवा प्रशिक्षणार्थीना विविध आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाली. त्यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे गत महिन्यात या प्रशिक्षणार्थीनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही.

जुने विद्यावेतन मिळाले; परंतु पुढे काय?

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये कार्यरत प्रशिक्षणार्थींच्या जुलै पासून ते डिसेंबरपर्यंत पाच कोटी ६२ लाख विद्यावेतन त्यांच्या बॅंक खात्यात देण्यात आले. शासनाच्या नियमानुसार विद्यावेतन शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येत असून १२वी पात्रता असलेल्यांना ६ हजार, १२वी व डिप्लोमा आयटीआयधारकांना ८ हजार तर पदवीधर प्रशिक्षणार्थींना १० हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येते.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

  • योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २९९ आस्थापनामध्ये प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत.

  • २ हजार ६८६ प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाला.

  • १८२ प्रशिक्षणार्थी शासकीय आस्थापना तर ११७ खाजगी आस्थापनांमध्ये काम करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.