Robin Uthappa : “क्रिकेटमध्ये सर्वाधिक…”, टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा काय म्हणाला?
GH News January 10, 2025 08:13 PM

टीम इंडियाने 2007 साली झालेला पहिलावहिवा वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने पाकिस्तानवर अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवत पहिल्यावहिल्या टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयात अनेक खेळाडूंसह रॉबिन उथप्पा याचंही योगदान होतं. रॉबिनने या स्पर्धेत विस्फोटक खेळी केली. तसेच रॉबिनने पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरीतील सामन्यात बॉल आऊट करुन टीम इंडियाला जिंकवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतर आता रॉबिन उथप्पा त्याने दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. रॉबिनने केलेल्या दाव्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. जगात सर्वाधिक आत्महत्या कोणत्या खेळात होत असतील तर त्या खेळाचं नाव क्रिकेट आहे, असं उथप्पाने सांगितलं. क्रिकेटपटूवर इतका प्रेशर असतो की त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि तो नैराश्यात जातो, असं उथप्पाने म्हटलंय.

रॉबिन उथप्पा काय म्हणाला?

“फार कमी लोकांना माहित आहे की क्रिकेटमध्ये आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण आहे. हे फक्त खेळाडूंपर्यंत मर्यादीत नसून अंपायर्स आणि बॉडकास्टर्सचीही हीच स्थिती आहे. सर्वाधिक आत्महत्या या खेळाशी संबधित लोकं करतात”, असं उथप्पाने म्हटलं. उथप्पाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला.

“क्रिकेटमध्ये टीम गेमसह वैयक्तिक कामगिरीलाही महत्त्व आहे. खेळाडूची आपला सहकारी ओपनरसर शर्यत असते. तसेच प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर असलेला तिसरा ओपनरही तुमच्या जागी खेळण्यासाठी उत्सूक असतो. फलंदाज याच भीतीसह 10-15 वर्ष खेळतो”,असंही रॉबिनने नमूद केलं.

“स्वत:चीच लाज वाटत होती”

“रॉबिनने या मुलाखतीत स्वत:बाबत एक किस्सा सांगितला. मला 2011 साली स्वत: चीच लाज वाटत होती. एक माणूस म्हणून मी जसा होतो त्यााबाबत मला लाज वाटत होती. नैराश्य आणि आत्महत्येबाबत बोलायचं झालं तर ग्राहम थोर्प यांनी स्वत:लं संपवलं. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांनी आयुष्याचे दोर कापले होते. सीएसके टीमचा पाया रचणारे वीबी चंद्रशेखर सर यांचंही नाव या यादीत आहे. मी पण नैराश्याच्या गर्तेत अडकलो होतो, तो एक वाईट प्रवास होता”, असं रॉबिनने म्हटलं.

“तुमच्या जवळची माणसं तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर तुम्ही ओझं झालात, असं वाटतं. आपण काहीच कामाचे नाही, असं आपल्या स्वत:ला वाटतं”,असंही रॉबिनने म्हटलं.

दरम्यान टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हा सहकुटुंब दुबईत स्थायिक झाला आहे. बंगळुरुतील वाहतूक कोंडीला वैतागून टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू कायमचाच दुबईत स्थायिक झालाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.