मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ आज ५९ वर्षांच्या झाल्या. अशोक सराफ आणि निवेदिता यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. खरं प्रेम काय असतं हे या जोडीने दाखवलं. इतक्या वर्षांचा सुखी संसार आणि एकमेक्नाची साथ या बळावर ही जोडी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. रंगभूमी, सिनेमा, मालिका या तीनही माध्यमांमध्ये सहज अभिनय कसा असावा हे निवेदिता यांच्याकडे पाहून कळतं. आज निवेदिता यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची एकूण संपत्ती आपण जाणून घेणार आहोत.
अशोक सराफ यांची संपत्तीएका मीडिया पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते अशोक सराफ यांची एकूण संपत्ती ३७ कोटींच्या घरात आहे. अशोक सराफ अनेक प्रोडक्टसाठी ब्रँड एंडोर्समेंट करताना दिसतात. त्यातून त्यांची बऱ्यापैकी कमाई होते. तर मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर ते साकारत असलेल्या भूमिका याशिवाय नाटकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या वयातही अशोक सराफ तिन्ही माध्यमांमध्ये मोठ्या हिमतीने आणि उत्साहाने काम करताना दिसतात.
एका प्रसिद्ध मीडिया पोर्टलच्या वृत्तानुसार, निवेदिता जोशी- सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास १० कोटी रुपये आहे. नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिराती अशा अनेक माध्यमांतून त्यांची कमाई होते. सोबतच त्या स्वतःचं युट्युब चॅनेलही चालवतात. त्यांना पाककलेची भयंकर आवड आहे. त्या या चॅनेलवर निरनिराळ्या रेसिपी करून दाखवतात. शिवाय त्यांचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड देखील आहे. 'हंसगामिनी' असं त्यांच्या साडीच्या ब्रँडचं नाव आहे.
त्यांच्या कामाबद्दल सांगायचं तर निवेदिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत दिसतायत. तर अशोक सराफ हे कलर्स वाहिनीवरील 'अशोक मा. मा.' या मालिकेत दिसत आहेत.