छोट्या पडद्यावरील ही मालिका मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या मालिकेतील मुक्ता हे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतेच मालिकेला राम राम केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजश्रीने ही माहिती चाहत्यांना दिली होती. त्यामुळे चाहतेदेखील नाराज झाले होते. यानंतर आता मालिकेत नवीन मुक्ता कोण येणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री स्वरदा थिगळे हीने मालिकेत एन्ट्री केल्याचं समोर आले आहे. स्वरदा थिगळे आता प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणार आहे. स्वरदाने नुकतेच सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर स्वरदाने प्रेमाची गोष्ट मालिकेचे शुटिंग सुरू असल्याचे पोस्ट केले आहे. स्टोरीमध्ये तिने प्रेमाची गोष्ट मालिकेच्या शुटिंगची तयारी करत असताना स्क्रिप्ट वाचत असल्याचे फोटो शेअर केले आहे. नवीन वर्षात नवीन सुरूवात असं तिनं कॅप्शन देखील दिलं आहे. यामुळेच आता तेजश्री प्रधानच्या जागी मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री स्वरदा थिगळे असल्याचं चित्र दिसत आहे.
अलिकडेच, तेजश्रीने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती मुक्ताच्या भूमिकेत दिसत होती. यामध्ये तिने लिहले होते की, कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं, तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या असण्याचा आदर करा कारण तुमच्यासाठी हे दुसरं कोणीही करू शकत नाही त्यामुळे स्वतःला ओळखा. त्यानंतर तोच फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर करत तिने लिहिलेले की, आजचा एक योग्य निर्णय तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्याकडे घेऊन जातो.