भाजपच्या 'या' बड्या नेत्याला लागणार आमदारकीची लॉटरी? राज्यपाल नियुक्त पाच आमदारांचा मार्ग तूर्त मोकळा
esakal January 11, 2025 06:45 AM

काही दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही इचलकरंजीतील कार्यक्रमात हाळवणकर यांच्या विधान परिषदेवर संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

इचलकरंजी : राज्यपाल नियुक्त १२ पैकी उर्वरित ५ आमदारांमध्ये इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांना लॉटरी लागणार काय, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी (Ichalkaranji Assembly Election) पक्षाच्या निर्णयानुसार यांनी उमेदवारीचा त्याग केला होता. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत चर्चा झाली होती.

आता या नव्या घडामोडीमुळे इचलकरंजीला नजिकच्या काळात आणखी एक आमदार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत (MLA Appointed by Governor) आक्षेप घेणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे उर्वरीत ५ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग तूर्त मोकळा झाला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ७ जणांची नियुक्ती केली होती, तर पाच जणांची नियुक्ती प्रलंबित ठेवली होती. त्यामुळे या संदर्भातील निकालाकडे राज्यातील संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. या निर्णयामुळे हाळवणकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून भाजपतर्फे राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली होती. वास्तविक पक्षाकडून हाळवणकर यांचा उमेदवारीवर पहिला हक्क होता. पण पक्षाच्या निर्णयानुसार त्यांनी कट्टर राजकीय विरोधक असलेले प्रकाश आवाडे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इचलकरंजीत आले होते. त्यांनी हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्यात येईल, असे जाहीरपणे सांगितले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही निवडणूक प्रचारावेळी इचलकरंजीला दोन आमदार मिळतील, असे भाकीत केले होते. या पार्श्वभूमीवर माजी आमदार हाळवणकर यांची विधान परिषदेवर कधी वर्णी लागणार याकडे त्यांच्यासह समर्थकांचे डोळे लागले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही इचलकरंजीतील कार्यक्रमात हाळवणकर यांच्या विधान परिषदेवर संधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. केवळ चर्चा होत राहिल्यामुळे हाळवणकर समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढत होती. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त उर्वरित ५ आमदारांची लवकरच नियुक्ती होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला ३ जागा आहे. यात हाळवणकर यांचे नाव निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.