कृष्ण जोशी joshikri@gmail.com
नुकतेच माधव जोशी लिखित ‘महाभारत ते भारत@२०२५’ हे विश्वकोशीय पुस्तक प्रकाशित झाले. इतिहास, राजकारण, कला, साहित्य, आर्थिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि समाजकारण अशा पन्नासएक क्षेत्रांमधील भारताच्या गेल्या साडेतीन हजार वर्षांच्या प्रवासाचा लेखाजोखा आणि गौरवगाथा पाचशे पानांच्या या पुस्तकातून उलगडते.
गारुडी आणि जादूगारांचा देश अशी एकेकाळी आपली आंतरराष्ट्रीय ओळख होती. त्या ओळखीपासून उत्पादन क्षेत्रात जगात दुसरा क्रमांक पटकावणारा, आर्थिक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला आणि चांद्रयानामुळे अंतराळात अन् संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या भारताच्या या अलौकिक प्रवासाचा व्यापक आणि गुंतागुंतीचा साडेतीन हजार वर्षांचा पट लेखक माधव जोशी यांनी समर्थपणे ‘महाभारत ते भारत @ २०२५’ या पुस्तकात मांडला आहे.
भारताची नैसर्गिक साधनसंपत्ती, सांस्कृतिक वारसा आणि आध्यात्मिक संपन्नता यांचे विविध पैलू समोर आणण्याचा प्रयत्न त्यात करण्यात आला आहे. आपल्या राष्ट्राच्या कर्तृत्वाची ओळख म्हणजे एका राष्ट्राच्या महान पुनरुत्थानाची गाथा आहे, ही भावना पुस्तकात सर्वत्र जाणवते. भारतासंबंधी कोणतीही माहिती हवी असेल तर ती या पुस्तकात मिळेल.
प्राचीन इतिहासापासून आधुनिक काळातील विषयांमध्ये सुसूत्रता असावी, यासाठी लेखकाने या पुस्तकातील ५७ प्रकरणांची पाच भागांमध्ये गुंफण केली आहे. पहिल्या ‘इतिहास आणि पाया’ या विभागात भारताची उत्पत्ती, प्राचीन संस्कृती, सुवर्णभूमी भारत, भगवद्गीतेची शिकवण आणि प्राचीन ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. ज्यातून उर्वरित पुस्तकाची पार्श्वभूमी तयार होते. दुसरा ‘राष्ट्र उभारणी आणि संस्कृती’वर आधारित आहे.
ऐतिहासिक विहंगावलोकनानंतरचा हा विभाग, भारताचा एक राष्ट्र म्हणून झालेल्या विकासावर लक्ष केंद्रित करतो. स्वातंत्र्यलढा, फाळणीचे दुःख येथपासून संविधान, साहित्य, संगीत, नाटक, सिनेमा, सण आणि क्रीडा यांविषयीच्या प्रकरणांचा समावेश केल्याने ऐतिहासिक घटनांपासून सांस्कृतिक यशाकडील प्रवास दिसतो.
शेती, कामगार चळवळ, उद्योग, परदेश व्यापार, विमा आणि बँकिंग, आयटी, बौद्धिक संपदा हक्क, व्यवसाय सुलभता यांच्या विवेचनातून ‘अर्थव्यवस्था आणि उद्योग’ हा तिसरा विभाग राष्ट्रनिर्मितीनंतरच्या भारताच्या आर्थिक उत्क्रांतीबद्दल माहिती देतो. ‘पायाभूत सुविधा आणि सेवा’ भागात अर्थव्यवस्थेनंतर आरोग्य, शिक्षण, ऊर्जा, रेल्वे, रस्ते, बंदरे, विमानसेवा यांसारख्या सार्वजनिक सेवांवर विवेचन आहे. हा विभाग आर्थिक क्षेत्रापासून आधारभूत सेवा-सुविधांपर्यंत आपल्याला सहजतेने फेरफटका मारून आणतो.
पाचवा भाग आहे, समाज आणि शासन... शेवटचा हा भाग सामाजिक सुधारणा आणि विकास, राजकीय उत्क्रांती, भविष्यातील आकांक्षा आणि विविधतेतील एकता, समाजातील बदल यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करतो. विकसित भारताच्या संकल्पनेवर, सर्वोत्तम होण्याच्या ध्यासावर पुस्तकाचा शेवट होतो.
हिंदू हा केवळ एक धर्म नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, ही संकल्पनाही पुस्तकात विस्ताराने मांडण्यात आली आहे. एकीकडे भारतीय राज्यघटनेचा गौरवशाली इतिहास आहे; तर दुसरीकडे आहे समाजसुधारकांनी आणि संतांनी घडवलेला नवा भारत.
हजारो वर्षांचा संपन्न ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी भारतभूमी नवकल्पनांचीही पंढरी आहे. ‘विकसित भारत’ ही संकल्पना जशी एक समृद्ध आणि विकसित राष्ट्राच्या आकांक्षांचे द्योतक आहे, तशीच ती सांस्कृतिक वारशाचे जतन आणि त्याचा सन्मान याच्याशीही घट्ट जोडलेली आहे.
आधुनिकतेची आणि परंपरेची कास धरत गुंतागुंतीची वाटचाल करताना आपल्या पूर्वजांनी दिलेल्या मूल्यांचा सन्मान राखत, सांस्कृतिक वारशाचे जतन करत, सर्वार्थाने प्रगती साध्य करता येईल, हीच जाणीव या पुस्तकात सर्वत्र शब्दबद्ध करण्यात आली आहे. भारताच्या विकासाचा पाया हा केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीत नसून, आपल्या समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागात आहे. आपले संविधान, आपल्या परंपरा आणि विविधतेतून निर्माण झालेली एकता, हे भारताच्या भविष्यातील प्रगतीचे मुख्य घटक असतील.
आपला वारसा जतन करीत असतानाच आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या साहाय्याने आपण सर्व मिळून एक नवीन भारत घडवू शकतो, असा रास्त विश्वास जागृत करणे हा पुस्तकाचा उद्देश आहे. दीडशे वर्षे भारताच्या प्रगतीचा अविभाज्य भाग असलेला टाटा समूह, टाटा ट्रस्ट आणि ज्यांच्याबरोबर दीर्घकाळ काम करायची लेखकाला संधी मिळाली, त्या आदरणीय रतन टाटा यांना हे पुस्तक लेखकाने आदरपूर्वक अर्पण केले आहे.
माझी कॉर्पोरेट दिंडी आणि माय कॉर्पोरेट ओडिसी, टाटा एक विश्वास आणि टाटाज, द एपिटोम ऑफ ट्रस्ट या यशस्वी पुस्तकांनंतर लेखकाची ‘महाभारत ते भारत @ २०२५’ आणि ‘महाभारत टू भारत @ 2025’ ही मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची जोडी प्रसिद्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वकील हरीश साळवे यांच्या नितांतसुंदर प्रस्तावना हे या पुस्तकाचे एक आकर्षण आहे.