BJP Victory : श्रद्धा, सबुरी अन् भाजपची महाभरारी; महाविजयअधिवेशनाची टॅग लाईन, शिर्डीत आज उदघाटन
esakal January 12, 2025 12:45 PM

शिर्डी : विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीत खालच्या पातळीवरील व्यक्तिगत टीका करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून गलिच्छ प्रचाराची राळ उडवून देण्यात आली, तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरी दाखविली. भाजपच्या हिंदुत्ववादी प्रचारावर श्रध्दा ठेवली. त्यांची व्यूहरचना आणि झंझावाती प्रचाराचा भाजपच्या महाविजयात महत्त्वाचा वाटा राहिला.

त्यामुळे भाजपच्या शिर्डीतील महाविजय अधिवेशनाची टॅग लाईन ‘श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी आहे. फडणवीसांची अजोड कामगिरी आणि ही टॅग लाईन हे या महाविजय अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट आणि महाविकास आघाडीने आगेकूच केली. मनोबल उंचावलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात सामना करण्यापूर्वी फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाचे अचूक विश्लेषण केले. महाविकास आघाडी आणि भाजप महायुतीत केवळ एक टक्का मतांचा फरक आहे.

भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी जरी वाढविली, तरी विजय नक्की आहे. हे त्यांचे विश्लेषण कार्यकर्त्यांसह सर्वांनाच भावले. त्याचबरोबर धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगावातील एकगठ्ठा मतांमुळे झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. लाडकी बहीण कामाला आली. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून फडणवीसांची व्यूहरचना यशस्वी ठरली. आता ते मुख्यमंत्रिपदाची दुसरी इनिंग सुरू करीत असताना हे अधिवेशन होत आहे.

जे. पी. नड्डांच्या हस्ते प्रारंभ

साईंच्या शिर्डीत रविवारी (ता. १२) भाजपचे एक दिवसाचे महाविजय अधिवेशन होत आहे. त्यानिमित्ताने सर्व प्रमुख रस्त्यावर स्वागत कमानी आणि झेंडे लावून शहर भाजपमय करण्यात आले आहे. पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता अधिवेशनास प्रारंभ होईल.

सायंकाळी पाच वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे मंत्री, आमदार आणि खासदार शहरात दाखल झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांमुळे शिर्डी गजबजून गेली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.