फेब्रुवारी-मार्चमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम खेळवला जाणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली असून लवकरच या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाईल. मात्र याआधीच टीम इंडियाला मोठा हादरा बसणार आहे. कारण टीम इंडियाचं ब्रह्मास्त्र जसप्रीत बुमरहा सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहचे टीम इंडियामध्ये असणे गरजेचे आहे. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सिडनी कसोटीमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सामना अर्धवट सोडून त्याला मैदान सोडावं लागलं होतं. तो दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह मार्चच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे तंदुरुस्त होईल. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना हा फेब्रुवारी सुरु होत असल्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याला जसप्रीत मुकण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराह सततच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. यामुळे तो आयसीसीच्या काही प्रमुख स्पर्धा तो खेळू शकला नव्हता. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप, 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना जसप्रीत खेळू शकला नव्हता.