मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक नीचांकी जागांवर घसरलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा जीवदान देण्यासाठी तरुण आणि उत्साही प्रदेशाध्यक्षाच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. मात्र तरुण नेत्यांनी अडचणीच्या काळात पक्षाच्या मागे उभे राहण्याचे सोडून पाठ फिरवली आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रथम प्राधान्याने काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद स्वीकाराण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी असमर्थतता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आमदार अमित देशमुख यांनीही प्रदेशाध्यक्षपद इतक्यात नको, अशी भूमिका घेत हात वर केले आहेत.
प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या इच्छुक नसल्याचे या दोघांनीही पक्षप्रश्रेष्ठींना स्पष्टपणे कळविल्याने काँग्रेसची भलतीच कोंडी झाली आहे. तिसरा पर्याय म्हणून विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या यशोमती ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू झाल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. मात्र तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. पटोले यांचा राजीनामा स्वीकारण्यापूर्वी नवीन प्रदेशाध्यक्ष निश्चित करणे आवश्यक असल्याने काँग्रेस नवीन प्रदेशाध्यक्षाच्या शोधात आहे.