- हृदयनाथ मंगेशकर, kunteshreeram@gmail.com
बाबा गाण्याच्या खोलीत बसले होते. बाजूला गणपत मोहिते, श्रीपाद जोशी, चंद्रकांत गोखले, शंकर मोहिते...सारे जण बाबांकडे चिंतेने, दुःखाने बघत होते. बाबांनी आईला बोलावले.
‘श्रीमती, मुलांना स्वच्छ आंघोळ घाल. ती धुळ्याची धूळ धुऊन टाक.
त्यांना जेवण दे आणि झोपव. मी थोड्या वेळाने येतो. चंद्रकांत, तू पुण्याला काम शोधणार होतास ना? मग इथ काय करतो आहेस?’
चंद्रकांत गोखले आदरपूर्वक म्हणाले : ‘मालक, काम मिळाले होते; पण गाणे? पण गाणे कोण शिकवणार? म्हणून मी काम सोडून इथे आलो. मालक, सांगलीत काही ना काही काम मिळेलच आणि माझी तालीमही अर्धवट राहणार नाही.’
बाबा शांतपणे म्हणाले : ‘मला जे गुरूंनी शिकवले ते मी सर्व तुम्हाला शिकवीन. धीर सोडू नका. आपल्याकडे आपली कला आहे. ती आपल्याला सांभाळेलच. मी निर्धन झालो म्हणून काय झाले? माझे संगीत तर माझ्याकडेच आहे ना!
आपल्याकडे ही चाळ आहे. सांगलीतले जुने मित्र आहेत. काही ना काही मार्ग निघेलच...आज मी थकलो आहे. उद्यापासून आपला रियाज सुरू करू या. चला, मी जरा विश्रांती घेतो.'
बाबा माईच्या खोलीत जात होते, तोच माईच्या भाचीचा आवाज ऐकून बाबा तिथेच थांबले.
‘माई, तुझ्या गळ्यातला तो चपलाहार दिसत नाही. मला तो हवा आहे. अगं, मनूचे लग्न आहे ना...‘मी लग्नात माईचा चपलाहार मनूला देणार’
असे मी त्यांना वचन दिले आहे.’
‘नाही शीतल, मी तुला हार देऊ शकणार नाही,’ माई शांतपणे म्हणाली.
‘मग तुझ्या बांगड्या...त्या दे. मी मनूला समजावीन की, हार मिळत नाही म्हणून.’
आई कडवट आवाजात म्हणाली :‘‘शीतल, तू, तुझा नवरा आणि चार मुलं असे सगळे जण सांगली शहर बघायला पाच वर्षांपूर्वी आलात. मालक काही बोलले नाहीत. आता तुला लग्नासाठी दागिनेसुद्धा हवेत?’
‘माई, आम्ही ऐकले ते खरे आहे का?’
‘काय ऐकलेस तू?’ माईचा तिखट स्वर.
‘तू सर्व दागिने देऊन टाकलेस?’
‘होय, मी सारे दागिने देऊन टाकले...मालकांच्या अब्रूचा प्रश्न होता.’
‘हो गं...पण ते तुझ्या लग्नातले दागिने, हौसेने केलेले...आता तसे दागिने कोण करणार?’
‘मालक करतील! मला खात्री आहे. मालक मला परत दागिन्यांनी मढवतील.’
‘श्रीमती, आज आम्ही थाळनेरला निघालो आहोत. मनूचे लग्न आहे. म्हणून आम्ही फार आशेत येथे थांबलो होतो; पण आता तूच लंकेची पार्वती झालीस, काय करणार?’
‘म्हणजे, पाच वर्षे तुम्ही माझ्या दागिन्यांसाठी थांबला होतात? मालक तर म्हणायचे, ‘श्रीमती, तुझे नातेवाईक तुझ्यावर किती प्रेम करतात. आपले गाव सोडून ते तुझ्यासाठी येथे थांबले आहेत...’ माई तिखटपणे म्हणाली.
‘नाही गं, तुझा गैरसमज होतोय. आम्ही तुझ्या प्रेमापोटी येथे थांबलो होतो; पण मनूचे लग्न आहे. आज जावे लागणार.’
‘खुशाल जा...सांभाळून जा,’ माई त्याच आवाजात म्हणाली.
आणि, माईचे दहा-पंधरा नातेवाईक निघून गेले. बाबांना भेटलेसुद्धा नाहीत. बाबा खोलीत गेले. म्हणाले : ‘श्रीमती, तुझे सारे नातेवाईक इतक्या तडकाफडकी का निघून गेले?’
‘बरे झाले...सांगली बघायला म्हणून आले होते...ते पाच वर्षे हललेच नाहीत. माझ्या नातेवाइकांना तुम्ही किती दिवस पोसणार?’ माई रागाने म्हणाली.
बाबा शांतपणे म्हणाले : ‘त्रागा करून घेऊ नकोस. चालायचेच!’
‘त्रागा करू नको तर काय करू? तुमच्या मातु:श्री, तुमचे बंधू कमलानाथ, तुमची बहीण विजयाबाई, त्यांची मुले...सारे सारे तुम्हाला न सांगता निघून गेले. तुमचे वैभव गेले काय...तुमचे-माझे नातेवाईक न सांगता निघून जात आहेत. आपण काय पैसे, मदत मागणार होतो त्यांच्याकडे?’ माई दुःखी होत म्हणाली.
‘कसले वैभव आणि कसले दागदागिने? आपले खरे वैभव आपले संगीत आणि ही लता...काय देवदत्त देणगी घेऊन आलीय पोरगी! आपले खरे वैभव ही मुले...ही मुले जागतिक कीर्ती मिळवतील बघ. श्रीमती, मी ज्योतिषी आहे. माझे भविष्य कधीही खोटे होणार नाही,’
बाबा विश्वासाने म्हणाले.
‘बरं, ज्योतिषीमहाराज! थोडे जेवा आणि शांत झोपा. मला माहीत आहे, या संसारी-सामान्य गोष्टींमध्ये तुम्हाला रस नाही. बरं, एक सांगा...मी कालपासून ऐकतेय...हे घर तुम्ही गहाण टाकणार आहात?’
‘होय... ही ‘दीनानाथ चाळ’ वेळ आली तर गहाण टाकावी लागेल.’
‘मला एक सांगा, तुम्ही आपल्या घराला चाळ का म्हणता?’
माई रागाने म्हणाली.
बाबा खळखळून हसत म्हणाले : ‘कारण, घराला चार-पाच खोल्या असतात...आणि या चाळीला बावीस खोल्या आहेत.’
‘आणि, त्या बावीस खोल्यांमधली नशिबाने एक खोली तुम्हाला मिळते. बाकीच्या, एकवीस खोल्यांमध्ये आपल्या दोघांचे नातेवाईक, तुमचे निराधार शिष्य असतात. खरे अवधूत आहात तुम्ही!’ माई हसत म्हणाली.
बाबा जेवले. साऱ्या मुलांना घेऊन शांतपणे झोपले. तीन दिवसांपूर्वी कंपनीचे सारे सामान, माईचे सर्व दागिने गेले...पण बाबा शांत झोपले होते. चेहऱ्यावर जराही खंत किंवा चिंता नव्हती. बाबांच्या शांत चेहऱ्याकडे माई कौतुकाने पाहत होती. बाबा आणि स्वामी विवेकानंद यांच्या चेहऱ्यांत विलक्षण साम्य होते. बाबा शेवटी शेवटी भगवे घालायचे. माई मला नेहमी सांगायची : ‘तुझे बाबा योगी पुरुष होते. मी त्यांना गमतीने ‘अवधूत’ म्हणायची.’
संध्याकाळ झाली...आणि गाण्याच्या खोलीत दोन तंबोरे वाजायला लागले. गणपत मोहिते म्हणजे गणूमामा तंबोरे फार छान मिळवायचा. सारी चाळ सुरांनी घुमू लागली...गावात दिवे लागू लागले...देवळात घंटा ऐकू येऊ लागल्या...
‘गोधुलीची बेला...’ साऱ्या गावात हंबरण्याचे आवाज उमटू लागले.
बाबा आपल्या आसनावर शांत बसले होते. आसन म्हणजे भिंतीला टेकवून ठेवलेली उशी...पण बाबांचे सारे शिष्य त्या उशीला आसन म्हणायचे. आलापी सुरू झाली. समोर मोठे कलाकार आणि गायक बाबांकडून शिकत होते. पूरिया धनाश्री सुरू झाला आणि साऱ्या खोलीत निळसर, पिवळट, भगवा रंग मिसळलेला एक अनोखा रंग फिरू लागला. एकेक शिष्य शिकत होता...बाबा त्यांना शिकवत होते. एक तास कसा संपला ते कुणालाच कळले नाही.
‘ए सदारंग, नित उठकर
देऽऽत दुहाई...सदारंग’
ही बंदिश बाबांनी गायला सुरुवात केली आणि ते कुठल्या तरी विचारात हरवले. अलीकडे असे वारंवार होई. गणूमामा ही चीज शिकवू लागला आणि थोड्या वेळाने बाबा भानावर आले.
‘गणू, चीजेचा अंतरा शिकव...मी पान खाऊन येतो,’ बाबा उठले आणि पान खायला माईच्या खोलीत गेले.
गाण्याच्या खोलीच्या दरवाजाला टेकून दीदी उभी होती. बाबा बाहेर गेले असे बघून ती पटकन् आत गेली आणि बाबांच्या आसनावर बसली. सगळे जण तिच्याकडे बघू लागले...
‘गणूमामा, ही बंदिश तू चुकीची गातोस...’ दीदी गांभीर्याने म्हणाली. गणूमामा, चंद्रकात गोखले, परशुराम सामंत, श्रीपाद जोशी यांनी दीदीला लहान पाहिले होते. ते सर्व दीदीकडे कौतुकाने पाहत होते.
गणूमामा खोट्या गंभीर आवाजात म्हणाला : ‘लता, तूच शिकव ही बंदिश. आम्हाला ती बरोबर जमत नाही. दीदी उशीला टेकली. शांतपणे डोळे मिटून तिने बंदिश शिकवायला सुरुवात केली. विश्ववीणा छेडून साक्षात् श्रीशारदा विश्वमोहिनीने पूरिया धनाश्री गाऊन संध्येला झुलवत रातीत प्रवेश केला.
बाबांचे सारे शिष्य आवाक् झाले. इतके सुरात आणि रागाची भावना जपून असे कोणी गाऊ शकते, याचे ते सारे साक्षीदार होते. तेही कसलेले गायक होते; पण दीदीचा सूर ऐकून सारे स्तब्ध झाले.
कोण गात होतं?
इवलीशी सरस्वती?
की ज्ञानेश्वरमहाराजांची ओवी?
की निर्मिती जय नावाच्या इतिहासाची?
की निर्मिती वाल्मीकींच्या रामायणाची?
की निर्मिती वेदांची?
की शारदेच्या पायातलं घुंगरू?
की शिवाचे डमरू?
की सीतेच्या डोळ्यातला अश्रू?
बाबा खडबडून उठले. ही लता गातेय? शुद्ध पूरिया धनाश्री. मंगेशीच्या देवळाला फेर धरून आरती गायिली जाते ती ‘तंद्री’ लताच्या स्वरात...देवळात नगारा वाजवतात तो ‘खर्ज’ लताच्या स्वरात... मंगेशीच्या गाभाऱ्यात ब्राह्मणांच्या मंत्रांचा घुमणारा घोष कुठल्या स्वरात नसतो...पण ध्यान लावणारा ‘अनाहत नाद’ मात्र असतो, तो लताच्या स्वरात...बाबा एकदम गाण्याच्या खोलीत गेले.
बाबांना बघून दीदी घाबरली. उठून जाऊ लागली. बाबा जोरात म्हणाले : ‘उठू नकोस, लता! या आसनावर इथे बसण्याची पात्रता तुझीच आहे. ‘श्रीमती’ अशी हाक मारत बाबांनी माईला बोलावले. माई धावत आली.
‘श्रीमती, हा बघ ‘छोटा दीनानाथ’ गातोय. आता मी मरायला मोकळा झालो. श्रीमती, आपण दोघे धन्य झालो. आपल्या पोटी साक्षात् श्रीशारदा विश्वमोहिनीने जन्म घेतलाय, जोपर्यंत लता आहे तोपर्यंत दीनानाथ आहे. मंगेशीतला श्रीमंगेश आहे.’
‘लता, तू इथे काय करतेस? आणि काय हे रूप? हे भगवे धोतर, हातात छोटी वीणा, डोक्यावर केसांची ही चोंगी, हातात चिपळ्या? काय संन्यास घ्यायला निघालीस काय?’ बाबा हसत म्हणाले.
‘नाही मालक, ही संन्यास घ्यायला निघली नाही. आज नाटकात ती नारदाचे काम करणार आहे?’
त्या दिवशी ‘स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग होता. नाटक ‘हाऊसफुल’ झाले होते. सारे खूश होते; पण नारदाचे काम करणारा नट आजारी पडला. नारदाचे काम करणारा कोणी दुसरा आहे का हे सारे शोधू लागले; पण ऐनवेळी कुठलाच नट मिळेना. साऱ्यांची धावपळ होत होती.
ती धावपळ बघून दीदी म्हणाली : ‘गणूमामा, तुम्ही एवढी चिंता का करता? मी आहे ना! मी नारदाचे काम करीन, मला नक्कल पाठ आहे.’
सगळेजण विचारात पडले. नाटकाचा ‘हाऊसफुल’ प्रयोग रद्द करण्यापेक्षा हा लहानसा नारद घेऊ या...मग दीदीला मेकप् केले गेले. तिचे लांब केस एकत्र करून त्यांचा चोंगा बांधण्यात आला. छोटी एकतारी तिच्या हातात देण्यात आली आणि नमस्कारासाठी बाबांकडे दीदीला पाठवण्यात आले.
बाबा गणूमामाला म्हणाले : ‘हा नारद माझ्या गुडघ्यांनाही लागत नाही. प्रेक्षक हसतील. हा काय वेडेपणा लावलाय तुम्ही?’
गणूमामा म्हणाला : ‘मालक, आज शो ‘हाऊसफुल’ झाला आहे आणि नारदाचे काम करणारा नट आजारी पडला आहे, म्हणून आम्ही लताला नारद केले. तिला नक्कल जशी पाठ आहे तशीच गाणीही पाठ आहेत. मालक, नारद हा ईश्वरच. तो बालकरूपही घेऊ शकतो. जर कुणी ही शंका घेतली तर आपण हे उत्तर देऊ.’
बाबांनी थोडा विचार केला आणि ते काम करायला तयार झाले. ते विंगेत उभे होते आणि नारदाचा प्रवेश होता. दीदी बाबांजवळ उभी होती. ती बाबांच्या गुडघ्यांना लागत होती. बाबांना हसू येत होते. ते दीदीला गमतीनं म्हणाले : ‘‘लता, वन्समोअर घेऊन ये. जर वन्समोअर मिळाला नाही तर तुला घरात घेणार नाही.’
दीदी आत्मविश्वासाने म्हणाली : ‘मी वन्स मोअर घेणारच...बाबा, तुम्ही बघाच.’
दीदी स्टेजवर गेली, तिची उंची बघून लोकांनी टाळ्या वाजवल्या. दोन वाक्ये बोलून दीदीने गायला सुरुवात केली. सारे रंगमंदिर स्तब्ध झाले. गाणे संपले आणि ‘वन्स मोअर’चा घोष झाला. दीदी परत गायिली, टाळ्यांचा कडकडाट झाला. दीदी विंगेत आली. बाबा विंगेत उभे होतेच. त्यांनी प्रेमभराने दीदीच्या डोक्यावर हात फिरवला. दीदीने त्यांच्याकडे फक्त पाहिले. त्या पाहण्यात भावी ‘भारतरत्न’चे अलौकिक द्रष्टेपण होते...त्या पाहण्यात ‘संगीतविश्व’ झळाळत झळाळत आसमंत पुंजाळत गेले.
अल्बर्ट हॅालमध्ये दीदीने शेवटचे गाणे संपवले...सात हजार श्रोते उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. एक मिनिट सरला, दोन मिनिटे सरली. टाळ्या संपत नव्हत्या. दीदी थकली होती. तिला आत जायचे होते; पण प्रेक्षक तिला सोडत नव्हते. दीदी टाळ्यांच्या कडकडाटात दहा मिनिटे भिजत होती. मी तिच्या खांद्यावर कौतुकाने हात ठेवला. तिने फक्त माझ्याकडे पाहिले. आणि...आणि माझा ‘मा. दीनानाथ’ झाला!