सांगली : ‘‘शिक्षणाने माणूस सुशिक्षित होत नाही. पूर्वी शिक्षणाविनाही जीवनोपयोगी कामे व्हायची. शिकलो म्हणून सुशिक्षितपणा येतो, हा अपसमज आहे,’’ असे स्पष्ट मत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या साहित्यिकास दिला जाणारा ‘काकासाहेब गाडगीळ पुरस्कार’ डॉ. भवाळकर यांना प्रदान करण्यात आला. पुण्यातील काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार अनंतराव गाडगीळ, प्रतिष्ठानचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, साहित्यिक डॉ. अरुण गद्रे, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांच्या हस्ते डॉ. भवाळकर यांचा सन्मान झाला. २५ हजार रुपये, मानपत्र असे याचे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, ‘‘देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन होत आहे. याचवेळी या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला, ही खूप चांगली बाब आहे; परंतु मराठी भाषेला आधीच अभिजात दर्जा प्राप्त आहे. संतांच्या काळापासूनच मराठी भाषेचा दर्जा मोठाच आहे. यामुळे मराठी भाषेविषयीची आस्था, अभिमान हा संतकाळापासूनच आहे. अभिजात याचा अर्थ उच्च, सुसंस्कृत आहे, मात्र हे कुणी ठरवायचे?
‘‘सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. जेव्हा लिहिता-वाचता येत नव्हते तेव्हापासून महिला जीवनोपयोगी कामे करीतच होती. लिहिता-वाचता आले म्हणजे सुशिक्षितपणा येतो, या अपसमजातून बाहेर पडले पाहिजे,’’ असे डॉ. भवाळकर म्हणाल्या.