मुंबई : भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. विविध कारणांमुळं भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात म्हणजेच पहिल्या 10 दिवसांमध्ये 22194 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. भारतातील कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल कमजोर असण्याची शक्यता, डॉलरची मजबूत होणं त्याचवेळी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे येत्या काही दिवसात अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. त्यानंतर टॅरिफ वॉर वाढण्याची शक्यता असल्यानं विदेशी गुंतवणूकदारांकडून काढता पाय घेतला जात आहे. डिसेंबर महिन्यात विदेशी गुंतवणूकदरांनी भारतीय बाजारात 15446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून 10 जानेवारीपर्यंत 22194 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. 2 जानेवारीचा दिवस वगळता ज्या दिवशी बाजार सुरु होता त्या दिवशी विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे समभाग विकून 22194 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाचे असोसिएट डायरेक्टर आणि रिसर्च मॅनेजर हिमांशु श्रीवास्तव यांनी म्हटलं की भारतीय बाजारातून विदेशी संस्थांकडून पैसे काढून घेतले जात आहेत त्याला अनेक कारणं आहेत. यामध्ये कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीच्या कामगिरीचे निकाल कमजोर असू शकतात हे एक कारण असू शकतं. याशिवाय ट्रम्प प्रशासनातील टॅरिफ वॉरची शक्यता, जीडीपीच्या विकास दरात आलेली मंदी, वाढलेली महागाई, भारतात व्याज कपात सुरु होण्याबाबत असलेली अस्थिर स्थिती, याशिवाय भारतीय रुपयाचं कमोजर होणं, अमेरिकी बाँड यील्ड मध्ये झालेली वाढ, भारतीय शेअर बाजाराचं अधिक मूल्यांकन यामुळं देखील विदेशी गुंतवणूकदार समभाग विक्री करत आहेत.
जिओजित फायनान्शिअल सर्विसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी.के. विजयकुमार यांनी म्हटलं की, एफपीआयकडून सातत्यानं सुरु असलेल्या विक्रीचं कारण डॉलर इंडेक्स मध्ये होत असलेली वाढ हे एक आहे. जो सध्या 109 वर आहे. 10 वर्षांसाठी बाँडवरील परतावा 4.6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळं गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत.
2024 मध्ये एफपीआयनं भारतीय शेअर बाजारात केवळ 427 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर, 2023 मध्ये ही गुंतवणूक 1.71 लाख कोटी इतकी होती.
इतर बातम्या :
अधिक पाहा..