Champions Trophy 2025 साठी अफगाणिस्तान संघ जाहीर, एकूण 18 खेळाडूंचा समावेश, कुणाला संधी?
GH News January 12, 2025 11:08 PM

अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करणारी चौथी टीम ठरली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेशनंतर आता अफगाणिस्तान क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी मुख्य संघात नियमांनुसार 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तर राखीव म्हणून 3 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हशमतुल्लाह शाहीदी अफगाणिस्तान संघाचं नेतृत्व करणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. राशिद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करेल, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र तसं न झाल्याने क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

इब्राहीम जादरानचं कमबॅक

अफगाणिस्तान टीममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून इब्राहिम जादरानचं कमबॅक झालं आहे. इब्राहीम गेली काही महिने दुखापतीमुळे टीममधून बाहेर होता. मात्र आता जादरान परतला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची ताकद आणखी वाढली आहे. इब्राहीमने आतापर्यंत 33 एकदिवसीय सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने 1 हजार 440 धावा केल्या आहेत. इब्राहीमने या दरम्यान 5 शतकं आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे इब्राहीमकडून चॅम्पिन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानला दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अफगाणिस्तानची पहिलीच वेळ

दरम्यान अफगाणिस्तानची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्तानने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय केलं होतं. अफगाणिस्तानने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 9 पैकी 4 सामने जिंकले होते. अफगाणिस्तान या 4 विजयांसह पॉइंट्स टेबलमध्ये साखळी फेरीनंतर सहाव्या स्थानी राहिली होती. अशाप्रकारे अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट मिळवलं.

अफगाणिस्तान बी ग्रुपमध्ये

दरम्यान अफगाणिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बी ग्रुपमध्ये आहे. अफगाणिस्तानसह या ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.

अफगाणिस्तानचं वेळापत्रक

21 फेब्रुवारी, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

26 फेब्रुवारी, विरुद्ध इंग्लंड, लाहोर

28 फेब्रुवारी, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अफगानिस्तान टीम: हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), इब्राहिम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, एएम गजनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक आणि नावेद जादरान .

राखीव खेळाडू : दरविश रसूली, नांग्याल खरोती आणि बिलाल सामी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.