Thane Fire: ठाण्यात इमारतीला भीषण आग; २५० रहिवाशांची सुटका, वाचा नक्की काय घडलं?
esakal January 13, 2025 01:45 PM

Thane Latest News: वागळे इस्टेट, श्रीनगर परिसरात गंगा विहार इमारतीमधील नित्यानंद लाँड्रीमध्ये रविवारी (ता. १२) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली.

या आगीच्या घटनेने इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने या इमारतीमधील तब्बल ४८ कुटुंबातील अंदाजे २५० रहिवाशांची सुटका करण्यात आली. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणली.

आगीच्या घटनेत लाँड्रीमधील इस्त्री, लाकडी कपाट, कपडे, विद्युत वायरिंग इतर साहित्य अक्षरशः जळून खाक झाले. या लाँड्रीमधील तीन व्यावसायिक सिलिंडर वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतल्याने मोठे अनर्थ टळला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असल्याची सूत्रांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, श्रीनगर पोलिस आणि महावितरण या विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. ही इमारत तळ अधिक चार मजली असून, प्रत्येक मजल्यावर १२ कुटुंब वास्तव्यास आहेत, तसेच तळमजल्यावर ३५०० स्क्वेअर फुटांचा लाँड्रीचा गाळा आहे. त्या गाळ्यातील कपडे, लाकडी कपाट, वायरिंग झाल्याने मोठ्या प्रमाणात धूर हा इमारतीमध्ये पसरली. यामध्ये अंदाजे २५० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

ही आग सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णपणे नियंत्रणात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. आगीच्या घटनेत लाँड्रीच्या गाळ्यामधील कपडे, कपाट, वायरिंग, इस्त्री व इतर साहित्य जळून खाक झाल्याने नुकसान झाले.

विद्युत केबलला आग

वागळे इस्टेट, शांतीनगर येथील पटेल प्रोव्हिजन स्टोअर या किराणा दुकानामधील इलेक्ट्रिक बोर्ड व विद्युत केबलला रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवानांनी १० मिनिटांत पूर्णपणे नियंत्रणात आणली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.