करुण नायरने टीम इंडियाचं दार ठोठावलं, पाच शतक ठोकून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मजबूत दावा
GH News January 13, 2025 05:13 PM

करुण नायर हा गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. 2022 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. मात्र त्याला तेव्हा संघात स्थान मिळालं नव्हतं. याबाबत तो सोशल मीडियावर व्यक्त झाला होता. तेव्हा त्याने ‘हे देवा.. कृपा करून मला अजून एक संधी दे’ असं लिहिलं होतं. पण मागच्या वर्षभरात करुण नायरने कमाल केली आहे. त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्धेच्या सहा पैकी पाच डावात शतकी खेळी केली आहे. यात पाच वेळा नाबाद राहिला हे विशेष..त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्या नावाचा विचार करणं भाग पडलं आहे. करुण नायर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. फॉर्मात असलेला खेळाडू संघात असला की त्याचा फायदा टीम होतो यात काही शंका नाही. करुण नायरच्या याच खेळीमुळे विजय हजारे ट्रॉफीत विदर्भ संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत विदर्भचा सामना महाराष्ट्राशी होणार आहे. हा सामना 16 जानेवारीला होणार आहे.

करुण नायर उपांत्य फेरीत सहा पैकी पाच डावात जबरदस्त खेळला. पहिल्या सामन्यात त्याने जम्मू-काश्मीरविरुद्ध नाबाद 112, छत्तीसगडविरुद्ध नाबाद 44 धावा, चंदीगडविरुद्ध नाबाद 163 धावा, तामिळनाडूविरुद्ध नाबाद 111, उत्तर प्रदेशविरुद्ध 112 धावा आणि राजस्थानविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत नाबाद 122 धावांची खेळी केली. पाच डावात त्याला प्रतिस्पर्धी संघ बादच करू शकला नाही. छत्तीसगडविरुद्ध एकमेव 44 धावा केल्या. त्यातही तो नाबाद हे विशेष आहे. लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. स्पर्धेच्या एका पर्वात पाच शतके झळकावणारा तामिळनाडूच्या नारायण जगदीसननंतरचा दुसरा फलंदाज आहे.

करुण नायरची आंतरराष्ट्रीय खेळी खूपच तोकडी राहिली. डिसेंबर 2016 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध नाबाद 303 धावा केल्या. त्यानंतर तो फक्त तीन टेस्ट खेळला आणि चार डावात 54 धावा केल्या. पण असं असूनही निवडकर्त्यांनी त्याला कधी पुढे खेळण्याची संधी दिली नाही. पण करुण नायरने कधीच खचला नाही. उलट मेहनत करत राहिला आणि त्याला आता नशिबाची साथही मिळाली आहे. आता विजय हजारे स्पर्धेतील कामगिरी पाहता त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी मिळते की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.