Pune News: पुणे, पिंपरीत येणार २०० सीएनजी बसेस
esakal January 13, 2025 03:45 PM

पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या २०० नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. यासंबंधीचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) पीएमपी प्रशासनाने नुकताच काढला आहे. एक महिन्यात नवीन बसची प्रतिकृती तयार होणार असून, मार्चपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात २०० बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदिन प्रवास करणाऱ्या सुमारे दीड लाख प्रवाशांची सोय होणार आहे.


पीएमपीच्या ताफ्यात ४०० सीएनजी बस दाखल होणार आहेत. यातील २०० बस स्वमालकीच्या तर २०० बस भाडेतत्त्वावरील आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात स्वमालकीच्या बस दाखल होतील. गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या प्रवासात आलेला विस्कळितपणा ४०० सीएनजी बसेसमुळे दूर होण्यास मदत होईल.

रोज ४५ बस पडतात बंद

पीएमपीच्या ताफ्यात २१०० बस असल्या तरीही प्रत्यक्षात १६५० बस धावतात. त्यापैकी सुमारे ४५ बस दररोज बंद पडतात. शिवाय आयुर्मान संपलेल्या बसेसची संख्याही जास्त आहे. त्यामुळे पीएमपीच्या प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होत आहे. यात नवीन बसची खरेदी होणे खूप आवश्यक होते.

बीआरटी व अन्य मार्गांवर धावणार


पुण्यात ‘बीआरटी’चे अंतर कमी होत असताना बीआरटी मार्गातून धावणाऱ्या बसेसची संख्या वाढणार आहे. नवीन ४०० बस सीएनजीवर धावतील. त्यांची रचना बीआरटी थांब्यानुसार असणार आहे. या बस बीआरटी व अन्य मार्गांवरही धावणार आहेत.

सीएनजीच्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ४०० नवीन बस आल्यानंतर दिवसाला किमान दोन लाख ९२ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढेल आणि प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागणार नाही.

स्वमालकीच्या २०० बसेससाठी आम्ही कार्यादेश काढला आहे. बसची प्रतिकृती, चेसीची तपासणी केल्यावर बसचे उत्पादन होईल. मार्च २०२५ पर्यंत २०० बस पीएमपीमध्ये दाखल होतील, अशी शक्यता आहे.


- नितीन नार्वेकर,
सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.