Yoga Record : मकरासनामध्ये मयुरेश मेटकरीचा नवा विक्रम...; सलग अडीच तास केले मकरासन
esakal January 13, 2025 03:45 PM

वालचंदनगर - वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील श्री वर्धमान विद्यालयातील इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या मयुरेश ज्ञानदेव मेटकरी या विद्यार्थ्याने तब्बल २ तास ३० मिनिटे ‘मकरासन ’ केले. पूर्वीच्या दोन तास मकरासनचा विक्रम मोडला आहे. इंटरनॅशनल योगा बुक मध्ये नवीन विक्रमाची नोंद होणार असून श्री वर्धमान विद्यालयाच्या शेरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला.

छतीसगढ येथील रितू कुंभकर या मुलीने यापूर्वी सलग दोन तास मकरासन करुन इंटरनॅशनल योगा बुकमध्ये मकरासनाच्या विक्रमाची नोंद केली होती. मयुरेश मेटकरी याने अडीच तास मकरासन करुन रितू कुंभकर हिचा विक्रम मोडला. तसेच मुलामध्ये एवढा वेळ मकरासन करणारा जगातील पहिलाच मुलगा ठरला आहे.

मयुरेश मेटकरी (रा.बांगार्डे ता.माळशिरस) याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.मात्र नवीन काहीतरी करुन दाखविण्याची ताकद आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर योगा क्षेत्रामध्ये खडतर परिश्रम करीत आहे. रविवार (ता.१२) रोजी मयुरेशने ने केलेले अडीच तासाचे मकरासन योगा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व रेकॉर्ड मोडीत निघणार आहेत.

राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत मयुरेश याने हा विक्रम रचला आहे. मयुरेशला वडील ज्ञानदेव मेटकरी यांनी स्वतः प्रशिक्षण देवून मकरासन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मकरंद वाघ,उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, प्राचार्य हनुमंत कुंभार, उपप्राचार्य रामनाथ नाकाडे,पर्यवेक्षक धनंजय उबाळे,शिवप्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. इंटरनॅशनल योगा बुकमध्ये विक्रमाची नोंद होण्यासाठी परीक्षक म्हणून दत्तात्रेय बिडकर, रवींद्र वेदपाठक, अे. यु. रणवरे, अरविंद देठे, विजयसिंह पाटील, डॉ. प्रज्ञा लोंढे, भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमीचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी काम पाहिले.

यावेळी कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, मयुरेश याने अत्यंत कमी वयात केलेला हा विक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.मयुरेश यशामध्ये महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला असुन इंदापूर तालुक्यातील वर्धमान विद्यालय,व माळशिरस तालुक्यासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. येणाऱ्या काळात मयुरेशला शासनाच्या माध्यमातून शक्य तेवढी जास्तीची मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी श्री वर्धमान विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार यांनी सांगितले की, मयुरेश मेटकरी यांच्या मकरासनाच्या विक्रमामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो आहे. मकरासनामध्ये श्री वर्धमान विद्यालयाच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.