Mumbai Winter: मुंबईवर धुके दाटण्याचा अंदाज; तापमान घसरण्याची शक्यता
esakal January 13, 2025 03:45 PM

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत धुक्याची चादर हटली असून, आकाश निरभ्र झाले आहे. अशातच सोमवारपासून किमान तापमान घसरण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईत धुके दाटणार असल्याचा अंदाज आहे.


सकाळच्या सत्रात ही धुक्याची चादर पसरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धुके दाटून येणार असल्याने किमान तापमानात घट होणार आहे. यामुळे किमान तापमानात घसरण होऊन १६ अंशांच्या खाली येणार असल्याने थंडीचा जोर वाढणार आहे. सध्या कुलाबा २०.६ आणि सांताक्रूझ १६.८ अंश सेल्सिअस इतके तापमान आहे.

त्यात आणखी घट होण्याचा अंदाज आहे, तर कमाल तापमान ३१ अंशांवर राहण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईतील गारवा वाढण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळेत धुके राहील आणि दुपार/संध्याकाळपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ अंश सेल्सिअस आणि १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे

मुंबईतील प्रदूषण निवळले


मुंबईतील प्रदूषण ही निवळले आहे. कुठेही हवेचा स्तर धोकादायक स्तरावर नाही. मुंबईतील बऱ्याच परिसरात समाधानकारक आणि मध्यम हवेची नोंद झाली आहे. कांदिवली, बीकेसी, वांद्रे, मुलुंड, पवई येथे हवेचा स्तर उत्तम आहे, तर नेहमीच प्रदूषण असणाऱ्या शिवाजीनगर भागातदेखील हवेचा स्तर आज सुधारलेला दिसला. मुंबईतील कुठेही हवेचा स्तर १२५च्या वर नोंद झालेला नाही. हवेचा वेग वाढल्याने स्तर सुधारल्याचे दिसते.

मुंबई माथेरानपेक्षा अधिक थंड
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पारा १७ अंश सेल्सिअसवर आहे, तर रविवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान हे १६.८ इतके आहे. मुंबई माथेरानपेक्षा अधिक थंड आहे. मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.